एसआयआर प्रक्रियेला महाराष्ट्रात गती
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 21
केंद्रिय निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी
नवी मुंबई ः केंद्रिय निवडणुक आयोगाने 2002 नंतर प्रथमच देशातील मतदारयाद्यांची विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) सुरु केले असून महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या छाननीबाबत मार्च 2026 मध्ये अधिसूचना जारी केली आहे. सर्वसामान्य मतदार या प्रक्रियेबाबत व कार्यक्रमाबाबत अनभिज्ञ असून मतदार याद्यांचे पुनरिक्षण करण्यापुर्वी त्याबाबत जनजागृती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
केंद्रिय निवडणुक आयोगाने देशातील बहुतांश राज्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे. नुकतेच आसाम, केरळ व बंगाल मधील मतदार याद्यांचे पुनरिक्षणाचे काम पुर्ण होऊन बंगाल राज्यातील 91 लाख मतदारांची नावे वगळली गेल्याचे वृत्ताने मतदारांमध्ये धडकी भरली आहे. यापुर्वी बिहार राज्यातील मतदार याद्यांचे पुनरिक्षणाचे काम हाती घेतल्यावर लाखो मतदारांची नावे मतदार याद्यांतून गायब झाल्याने मोठा गहजब माजला होता. अनेक जिवंत मतदारांना मृत दाखवून त्याची नावे वगळल्यानंतर संबंधित मतदारांना सर्वोच्च न्यायालयापुढे उभे करण्यात आल्यावर या कार्यक्रमातील गंभीर त्रुटी उघडकीस आल्या. महाराष्ट्रातही लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान 35 लाख मतदारांची नावे केंद्रिय निवडणुक आयोगाने वाढवली होती. त्यावेळीही मोठा गदारोळ विरोधकांनी करुन याबाबत याचिका दाखल केल्या होत्या.
केंद्रिय निवडणुक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुक याद्या अद्यावत करण्याच्या हेतुने राज्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण करण्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी 18 मार्च 2026 रोजी अधिसूचना जारी केली असून राज्यातील 288 मतदारसंघात एकुण 1646 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नेमणुक केली आहे. या अधिकाऱ्यांची नेमणुक महसूल, नगरविकास विभाग, कृषी विभाग व शिक्षण विभागातून केली आहे. नेमणुक झालेल्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी त्या-त्या तालुक्यातील बिएलओंना या कार्यक्रमासाठी आदेश काढेल असून मतदार याद्या व मतदार कशापद्धतीने अद्यावत कराव्या याबाबत त्यांचे प्रशिक्षण सुरु असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही वर्षात मतदारयाद्या अद्यावत करताना हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याने केंद्रिय निवडणुक आयोगाच्या या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या प्रक्रियेबाबत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद केला तरीही बंगालमधून निवडणुकीपुर्वी 91 लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याने मोठा असंतोष पसरला आहे. त्याचधर्तीवर जर महाराष्ट्रातील मतदारांची नावे वगळली जाण्याच्या भितीने मतदारांनी याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची मागणी केली आहे. सदर प्रक्रिया राज्य निवडणुक विभागाने राबवण्यास सुरुवात केली असतानाही राज्यातील विरोधीपक्षनेत्यांच्या उदासिनतेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. दरम्यान, राज्यातील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम पत्रिका राज्य निवडणुक आयोगाने जिल्हानिहाय प्रसिद्ध करावी अशी मागणी मतदार करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai