शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 15, 2026
- 21
नवी मुंबई ः आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांचे जीव वाचविण्यासाठी अग्निशमनाचे कार्य करणाया जवानांच्या कार्यतत्परतेला व सेवाभावाला सलाम करीत आपले कर्तव्य बजावताना प्राणांचे बलिदान करणाऱ्या अग्निशमन जवानांना नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आदरांजली अर्पण केली.
नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या वतीने वाशी अग्निशमन केंद्रात अग्निशमन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी शहीद अग्निशमन जवानांच्या स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आणि उपस्थित अग्निशमन जवानांशी संवाद साधला. याप्रसंगी आयुक्त डॉ,कैलास शिंदे, नगरसेविका अंजली वाळुंज, मुख्य अग्निशमन अधिकारी तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरूषोत्तम जाधव, विभागीय अग्निशमन अधिकारी गजेंद्र सुसविरकर यांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. अग्निशमनाचे कार्य तत्परतेने करीत असतानाच आग लागू नये याकरिता घ्यावयाच्या खबरदारीबाबत किंवा आग लागल्यानंतर अग्निशमन दल येईपर्यंत तातडीने करावयाच्या बजाव कार्याबाबत नागरिकांकरिता माहिती व मार्गदर्शक उपक्रम राबविताना गावठाण भागातील नागरिकांमध्येही व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याकडे विशेष लक्ष द्यावे असे यावेळी महापौर महोदयांनी सूचित केले. याप्रसंगी बोलताना आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अग्निविमचनाचे काम करताना शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करीत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठीची खबरदारी घेण्याचा संदेश अंगिकारण्यासाठी अग्निशमन सेवा दिन महत्वाचा असल्याचे सांगितले. नवी मुंबईत आता बहुमजली उंच इमारती उभ्या रहात असून यापुढील काळात आपल्यापुढील आव्हाने मोठी असल्याचे सांगत फायर ऑडिट नियमित करणे, त्याची तपासणी करणे, नियमितपणे मॉक ड्रील घेणे, नागरिकांमध्ये जागरूकता आणणे, विशेषत्वाने सोसायट्यांमध्ये वा रस्त्यावर अग्निशमनाचे वाहन जाण्यास अडथळा होईल अशाप्रकारे रहिवाश्यांनी वाहने पार्कींग करण्याचे टाळणे या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. ‘सुरक्षित शाळा, सुरक्षित रूग्णालय आणि अग्नि सुरक्षिततेसाठी जागरूक समाज अग्नि प्रतिबंधकतेसाठी एकत्रितपणे’ हे अग्निशमन सेवा दिनाकरिता यावर्षी केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेले घोषवाक्य आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 5 अग्निशमन केंद्राद्वारे शहर सुरक्षिततेची जबाबदारी नमुंमपा अग्निशमन दल पार पाडत असून आपत्तीनंतर आपत्ती निवारणाचे कार्य तत्परतेने करण्यासोबतच आपत्ती उद्भवूच नये याकरिता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे उपक्रम प्रात्यक्षिकासह राबविण्यावर भर देण्यात येत आहे.
14 एप्रिल 1944 रोजी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये एस एस फोर्ट स्टिकीन या जहाजाला लागलेल्या आगीत मुंबई अग्निशमन दलातील 66 जवानांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन अग्निविमोचनाचे कार्य केले. या शहीद जवानांना तसेच त्यानंतरही अग्नीविमोचनाचे कार्य करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या शहीद जवानांना भावपूर्ण अभिवादन करीत 14 एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन सेवा दिन’ म्हणून देशभरात पालन करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून 14 ते 20 एप्रिल 2026 या कालावधीत संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील मॉल्स, मोठ्या सोसायट्या, हॉस्पिटल्स, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी अग्निसुरक्षतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे तसेच विविध ठिकाणी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. प्रात्यक्षिकांसह होणारे हे उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत व विशेषत्वाने विद्यार्थी, युवकांपर्यंत पोहचविले जाणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai