हजारो नागरिकांचे महामानवाला अभिवादन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 15, 2026
- 25
नवी मुंबई महानगरपालिकेचे सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ज्ञान हीच शक्ती या संदेशाचा प्रत्यक्ष अविष्कार घडविणारे ज्ञानस्मारक म्हणून नावाजले जात आहे. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नागरिकांनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी याठिकाणी सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. सध्या हवेत उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवत असला तरी सायं. 6.30 वाजेपर्यंत 7800 हून अधिक नागरिकांनी स्मारकाला भेट दिली. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्मारकास भेट देऊन विनम्र अभिवादन केले. महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, सभागृह नेते सागर नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर व नगरसेवक सुधाकर सोनावणे व इतर नगरसेवक, समिती सदस्य यांनीही स्मारकास भेट देत अभिवादन केले.
स्मारकाला भेट देणा-या नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या वतीने अल्पोपहार व चहापाणी व्यवस्था करण्यात आलेली होती. येथील उत्तम व्यवस्थेबद्दल नागरिकांनी महानगरपालिकेची प्रशंसा केली. नवी मुंबईतून ठिकठिकाणाहून निघणाऱ्या मिरवणूका, रॅली यांनीही स्मारकाला भेट देऊन अभिवादन करून पुढे जाण्यास पसंती दर्शविली. बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून 3 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 या कालावधीत राबविण्यात आलेली ‘जागर’ ही विशेष व्याख्यानमाला नागरिकांच्या अतिशय उत्साही प्रतिसादामुळे यशस्वी झाली. नागरिकांची वाढती गर्दी पाहून सभागृहाबाहेर एलईडी स्क्रिन लावून व्याख्याने थेट प्रक्षेपित करावी लागली हा सध्याच्या काळातील व्याख्यानांना होणा-या गर्दीचा दुर्मीळ अनुभव या जागर व्याख्यानमालेतून आला. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त तथा स्मारकाच्या प्रमुख श्रीम.संघरत्ना खिल्लारे आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी जयंती उत्सवानिमित्त नागरिकांकरिता सर्व सुविधांची पूर्तता केली होती. जयंती दिनानिमित्त स्मारकाला लक्षवेधक विद्युत रोषणाई करण्यात आली असून हे देखील जयंतीदिनाचे खास आकर्षण आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai