पावसाळापूर्व कामांना 15 मे ची मुदत
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 25, 2026
- 27
आयुक्तांचे संबधित विभागांना दिले निर्देश
नवी मुंबई ः सध्या सुरु असलेली पावसाळापूर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करावीत तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणांनी एकमेकांशी समन्वय राखून पावसाळी कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच मदतकार्यासाठी तत्पर रहावे असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले.
नवी मुंबई महापालिकेच्या शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची नियोजन बैठक समितीचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. या आढावा बैठकीमध्ये पावसाळ्याच्या अनुषंगाने त्याआधी करावयाचा अत्यावश्यक कामांची बाबनिहाय माहिती घेण्यात आली व या कार्यवाहीला वेग देण्यात यावा असे सूचित करण्यात आले. यामध्ये प्राधान्याने पावसाळ्याआधी करण्यात येणारी नालेसफाई व मोठ्या गटारांची सुरु असलेली सफाई कामे गती देऊन व्यवस्थितरित्या पूर्ण करावीत व त्यामध्ये महत्वाचे म्हणजे सफाई करताना नाले व गटारे यांच्या काठावर काढून ठेवला जाणारा गाळ काहीसा सुकल्यानंतर लगेच उचलला जावा याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. धोकादायक इमारती हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याचे लक्षात घेत सर्व इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्याच्या लेखी सूचना देण्यात याव्यात व तसे प्रसारमाध्यमांतून आवाहनही करण्यात यावे असे सूचित करीत आयुक्तांनी मागील महिन्यामध्ये कोपरखैरणे येथे व काल नेरुळ येथे इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घडलेली दुर्देवी घटना लक्षात घेता सी-1 कॅटेगरीतील अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या तत्परतेने रिकाम्या करून घ्याव्यात असे निर्देश सर्व विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले.
महानगरपालिका क्षेत्रात व त्यातही एमआयडीसी भागात मोठया प्रमाणावर रस्ते व इतर सुविधा कामे सुरु असून ती जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात आणून देऊन त्या परिसरात नागरिकांचे वास्तव्य असल्यास त्यांचे तत्परतेने स्थलांतरण करावे असे आयुक्तांनी सूचित केले. विशेषत्वाने नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात झोपडया असल्यास त्यांच्या स्थलांतरणाची कार्यवाही तातडीने करण्याचे आयुक्तांनी सूचित केले. पावसाळी कालावधीपूर्वी धोकादायक झाडे व झाडांच्या फांदयांची गरजेएवढी छाटणी करण्याबाबत कार्यवाही नियोजनबध्द रितीने करावी असेही निर्देश देण्यात आले. सर्व प्राधिकरणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे व अनधिकृत होर्डींग हटविण्याची कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.
सायन पनवेल महामार्ग असल्याने तो खड्डेमुक्त व सुस्थितीत रहावा या दृष्टीने संपूर्ण काळजी घ्यावी तसेच वाहतूक पोलीसांच्या सहयोगाने वाहतूकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही आणि प्रामुख्याने पावसाळ्यात रहदारीला अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. ओव्हरहेड वीजवाहिन्या भूमिगत करण्याची कार्यवाही करण्यात यावी असेही सूचित केले. यावेळी वाहतूक पोलीस उपआयुक्त तिरूपती काकडे यांनी शहरातील विविध भागांमध्ये पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे असलेल्या कामांची जागानिहाय माहिती दिली. याबाबत आयुक्तांनी संबंधितांना आदेश देऊन ही कामे प्राधान्याने हाती घेण्याचे व विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
अतिवृष्टी झाल्यास पाणी साचण्याच्या संभाव्य जागांवर पुरेशा संख्येने पम्पींग मशीन व मनुष्यबळ कार्यांन्वित राहील याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. रेल्वे स्टेशन्समधील आवश्यक कामे सिडको व रेल्वे प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने पूर्ण करावीत. एपीएमसी मार्केट प्रशासनाने अंतर्गत नालेसफाई व स्वच्छता याची काटेकोर काळजी घ्यावी असे निर्देश दिले. पावसाळी कालावधीत संभाव्य साथरोग नियंत्रणासाठी तसेच मलेरिया व डेंग्यूसारख्या संभाव्य आजारांबाबत आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला करण्यात आल्या तसेच जलजन्य आजार नियंत्रणासाठी उपाययोजना करणे व पुरेसा औषधसाठा करुन ठेवणे याविषयी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. मोरबे धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जलवितरण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पदाधिकारी व नगरसेवक यांच्याशी समन्वय साधून जलनियोजन करावे असे आयुक्तांनी सूचित केले. कोणतीही आपत्ती सांगून येत नाही मात्र त्यादृष्टीने खबरदारी घेणे आणि दुर्देवाने आपत्तीजनक घटना घडलीच तर त्यासाठी पूर्वतयारी करुन ठेवणे गरजेचे असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच प्राधिकरणांनी सतर्क रहावे असे सूचित करीत महापालिका आयुक्त तथा नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्येक प्राधिकरणाने आपापली पावसाळापूर्व जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडावी आणि पावसाळी कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यादृष्टीने परस्परांशी समन्वय राखावा असे सूचित केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai