शिवसेनेचे तीन नगरसेवक भाजपच्या गळाला

नवी मुंबई : पालिकेची निवडणुक जवळ आल्याने फोडाफोडीच्या राजकारणाने जोर धरला आहे. घणसोली येथील शिवसेनेचे तीन नगरसेवक भाजपाच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा नवी मुंबईत आहे. काही दिवसांपासून सुरु झालेल्या पक्षांतरामुळे आपल्या नगरसेवकांना पक्षांतर करण्यापासून रोखण्याचे मोठं आव्हान सर्व पक्षांसमोर उभे राहिले आहे.

नवी मुंबईच्या घणसोली येथील शिवसेनेचे एकाच कुटुंबातील तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. या नगरसेवकांमध्ये नगरसेविका कमलताई पाटील, प्रशांत पाटील आणि सुवर्णा पाटील यांचा समावेश आहे. घणसोलीतील या सेंट्रल पार्कचा लोकार्पण सोहळा गुरुवारी होणार आहे. या कार्यक्रमाचे पोस्टर्स शहरभर लावले आहेत, त्या पोस्टर्सवर या तीनही नगरसेवकांचे फोटो झळकले आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. गेली अनेक वर्ष महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणार्‍या गणेश नाईक यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीमार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात केले जात आहेत. मात्र नगरसेवकांनी पक्षंातराचे राजकारण सुरु केल्याने पालिका निवडणुक चुरशीची ठरणार आहे.