बहुउद्देशीय इमारतीची पुनर्बांधणी 70 कोटींवर
- by संजयकुमार सुर्वे
- May 22, 2026
- 27
करदात्यांच्या वाया गेलेल्या 6 कोटींची जबाबदारी कोणाची?
नवी मुंबई ः वापरण्यापुर्वीच धोकादायक ठरलेली बहुउद्देशीय इमारत पाडून तेथे 70 कोटी रुपये खर्च करुन नवीन इमारत बांधण्याचा घाट महापालिकेच्या शहर अभियंता विभागाने घातला आहे. हा खर्च करण्यापुर्वी धोकादायक ठरलेल्या इमारतीवर केलेल्या 6 कोटी रुपयांचा खर्चाची जबाबदारी निश्चित न करता सदर इमारत पाडण्यासाठी 50 लाखांची निविदा प्रक्रियाही राबवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, अधिकारी व वास्तुविशारद यांना वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या पालिकेत आहे.
2012 मध्ये वाशी सेक्टर 14 येथे भुखंड क्र. 4 व 5 वर बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवली होती. सदर बांधकामासाठी 6 कोटी 99 लाखांचे काम मे. मोक्षा एंटरप्रायझेस यांना देण्यात आले होते. या कामावर वास्तुविशारद म्हणून हितेन सेठी आणि असोसिएटस यांची नेमणुक करण्यात आली होती. कार्यादेशात निविदा बनवने, इमारतींना नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी घेणे, प्रकल्पाचे आराखने बनवणे, आरसीसी डिझाइन बनवणे ही जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. सदर इमारतीचे 3 मजल्यांचे बांधकाम पुर्ण झाल्यावर पहिल्या व दुसऱ्या मजल्याचे स्लॅब वाकले असल्याचे निदर्शनास आले होते.
सदर बाब लक्षात आल्यानंतर सदर इमारतीच्या बीमला लोखंडी खांबांचा आधार देऊन सदर वास्तु वापरण्यायोग्य करण्याचा प्रयत्न सल्लागारांमार्फत करण्यात आला होता. परंतु, 2018 मध्ये मुंबई आयआयटीने दिलेल्या सल्ल्यानुसार सदर इमारत धोकादायक असून ती पाडून तेथे नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला. या कामाचे कंत्राटदार मोक्षा एंटरप्रायझेस यांना 4.5 कोटी रुपये देण्यात आले असून वास्तुविशारद यांनाही 15 लक्ष रुपये देण्यात आले आहेत. इमारतीच्या सुरक्षिततेबाबत सल्ला प्राप्त करुन घेण्यासाठी अतिरिक्त 20 लाख रुपये खर्च करण्यात आले. पालिकेचे सुमारे पाच कोटी रुपयांहून अधिक रक्कम सदर इमारतीवर खर्च होऊनही आणि सदर वास्तु वापरापुर्वीच धोकादायक ठरली तरी आतापर्यंत एकाही पालिका आयुक्तांनी पालिका अधिकारी, ठेकेदार किंवा वास्तुविशारद यांची जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया राबवली नाही.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संजय सुर्वे यांनी याबाबत वास्तुविशारद हितेन सेठी यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करुनही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आयुक्त अथवा शहर अभियंता विभागाने दिलेला नाही. दरम्यान, पालिकेने सदर इमारत पाडण्यासाठी 50 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबवली असून या भुखंडावर 70 कोटी रुपये खर्च करुन 11 मजली बहुउद्देशीय इमारत उभारण्याचा घाट पालिकेने घातला आहे. या कामावर वास्तुविशारद म्हणून द फर्म या संस्थेची नेमणुक केली असून त्यांना 4 टक्के शुल्क अदा करण्यात येणार आहे. दरम्यान, जनतेच्या पैशाची नासाडी होत असताना शहराचे महापौर, शिल्पकारांनी मौन बाळगल्याने नवी मुंबईकर आश्चर्य व्यक्त करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे