गावठाण विस्ताराचेही भूमापन सर्वेक्षण करा

ग्रामस्थांची मागणी ः मुळ गावठाणांच्या सर्वेक्षणाला करणार विरोध 

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात रोज नव्या घडामोडी होत असताना आता नवा मुद्दा निर्माण झाला आहे. नगर भूमापन ठाणे यांनी सारसोळे गावचे नगर भूमापन मोजणी 12 मार्चपासून सुरू करण्याचे ठरविले आहे. याला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असून फक्त गावचे भूमापन न करता गावठाण विस्ताराचेही भूमापन सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. 

नवी मुंबईतील मूळ गावठाणे व गावठाण विस्तार यांचा सर्व्हे न झाल्याने गावठाण विस्ताराचा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बेलापूर गावठाण व गावठाण विस्ताराबाबतचा सर्व्हेे करण्याचा प्रयत्न झाला होता. या वेळी नवी मुंबईतील मूळ ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध केल्याने सर्वेक्षण बारगळले होते. आता नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यात नुकतेच नगर भूमापन अधिकारी ठाणे यांच्यामार्फत सारसोळे गावचे नगर भूमापन मोजणी 12 मार्चपासून सुरू करण्याचे पत्र देण्यात आले आहे. हे सर्वेक्षण फक्त गावापुरते न राहता गावठाण विस्ताराचेही भूमापन होणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांचे आहे. त्यामुळे या भूमापनालाही 29 गावांमधून विरोध होणार आहे. नवी मुंबई विकसित करण्याकरिता येथील प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या 100 टक्के जमिनी सिडकोस दिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचेही भूमापन सर्वेक्षण केले पाहिजे, ही ग्रामस्थांची भूमिका आहे.

सारसोळे ग्रामस्थांनी मोजणीच्या दिवशी उपस्थित राहून आपापल्या जागेच्या हद्दी दाखवून मोजणीस सहकार्य करावे, असे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आले आहे. गावठाण विस्ताराच्या मोजणीबाबत संबंधित विभागाने पत्रात सुधारणा करीत गावठाण व गावठाणापासून 200 मीटर असे नमूद करण्यात आले होते, परंतु त्याऐवजी फक्त गावठाण परिसीमेतील असे वाचावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी गावठाण विस्ताराचे सर्वेक्षण व मोजणी होणार नसेल तर गावातील भूमापन मोजणी होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.