मालमत्ता करात वाढ नाही

पनवेल : गेल्या वर्षीच्या तुलनेत 129 कोटी रुपये घट असलेला पनवेल महानगरपालिकेचा अंदाजित अर्थसंकल्प शुक्रवारी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्थायी समितीकडे अर्थसंकल्प सुपूर्द केला. यावेळी सामान्यांच्या मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. 

906 कोटी रुपयांचे अंदाजित उत्पन्न आणि 904.31 कोटी रुपयांचा खर्चाचा तपशील देत आयुक्त देशमुख यांनी एक कोटी 69 लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प समितीसमोर मांडला. स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी यावर अभ्यास करण्याची सूचना केली. पालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींमधील रहिवाशांकडून मागील साडेतीन वर्षांचा मालमत्ता कर या वेळी पालिकेच्या तिजोरीत पडेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. पालिकेच्या उत्पन्नात यंदा दीडशे कोटी रुपयांची वाढ होणार आहे. थकीत मालमत्ता कराला रहिवाशांचा होणारा विरोध लक्षात घेऊन आयुक्तांनी यंदाच्या आर्थिक वर्षांचे उत्पन्न या अर्थसंकल्पामध्ये गृहीत धरले आहे. वस्तू व सेवा करातून पालिकेला दरवर्षी मिळणारे उत्पन्न 72 कोटी असतानाही 125 कोटी रुपये अनुदानाचे उत्पन्न या अर्थसंकल्पामध्ये मांडले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पावसाळी पूरसदृश स्थितीवर मात करण्यासाठी लोकवस्ती आणि खाडी क्षेत्रादरम्यान उभारण्यात येणारे कालवे, संरक्षित भिंती या कामांसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सिडको वसाहतीत लागू करण्यात येणार्‍या मालमत्ता करातून 150 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींना 1 एप्रिलपासून मालमत्ता कर लागू केला जाणार हे निश्चित झाले आहे.

ठळक वैशिष्टय्े 

मागील वर्षी पनवेलच्या तापमानात तीन टक्क्यांनी वाढ असल्याचा अहवाल पर्यावरण समितीने दिल्यानंतरही पर्यावरणविषयक कोणतीही तरतूद नाही.

10 टक्के मुद्रांक शुल्क अनुदानापोटी पालिकेच्या तिजोरीत 60 कोटी रुपयांचे अनुदान जमा होण्याचे संकेत

अमृत योजनेसाठी पालिकेकडून चालू आर्थिक वर्षांत नव्याने 98 कोटी रुपये अनुदानाची तरतूद. पनवेल पालिका क्षेत्रात सध्या 80 दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे रसायनी येथील पाताळगंगा नदीतून पनवेलसाठी सुमारे शंभर दशलक्ष लिटर पाणी उचलणार.

सुमारे दीडशे कोटी रुपये खर्चाचे स्वराज्य या पालिका मुख्यालयाच्या कामाला सुरुवात. यासाठी 35 कोटी रुपयांची तरतूद.

पालिकेत सध्या 350 कर्मचारी आणि अधिकारी असले तरी भविष्यात एक हजार 946 पदांच्या भरतीनंतर पालिकेचा आस्थापना खर्च 68 कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे.


वर्ष             अंदाजित    प्रत्यक्ष

2020-21       906         904


गावांसाठी 25 कोटी

मागील वर्षी पालिकेने स्मार्ट व्हिलेज अंतर्गत चार गावांसाठी 64 कोटींची विकास कामे केली. पनवेल पालिका क्षेत्रात 29 गावे आहेत. यावर्षी पाच गावांत स्मार्ट व्हिलेज अंतर्गत 25 कोटी रुपयांचा तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.