हलगर्जीपणा बेतला जीवावर
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 03, 2026
- 14
संबंधित कार्यप्रमुखांवर कारवाई; प्रकरणांच्या चौकशीसाठी आयुक्तांनी नेमली समिती
नवी मुंबई ः नवी मुंबईत काही अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर बेतला असल्याचे दोन घटनांतून समोर आले आहे. विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे दोन तरुणी रस्त्यात विजेचा झटका लागून गंभीर जखमी झाल्या. तर पालिकेच्या ऐरोली माता-बाल रुग्णालयात 2 गर्भवतींची इंजेक्शननंतर प्रकृती खालवली. यापैकी एकीला आपला जीव गमवावा लागला तर एकीची प्रकृतीत उपचारानंतर सध्या सुधारणा होत आहे. या दोन्ही घटना संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची प्रथमदर्शनी दिसत असून पालिका आयुक्तांनी तात्काळ कारवाई केली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे.
पालिकेच्या राजमाता जिजाऊ सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली, येथे सोनम डोंगरे व रिचा मिश्रा या 08 महिन्यांच्या 02 गर्भवती महिला दाखल झाल्या होत्या. दोन्ही रूग्णांना उपचाराकरीता इंजेक्शन दिले होते. त्यानंतर दोघींची प्रकृती गंभीर झाली. त्यांना पुढील उपचाराकरीता वाशी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोनम डोंगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे असल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरीता चौकशी समिती नेमून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सदर दोन्ही इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्यात आला असून सदर सर्व इंजेक्शन्स सिलबंद केले असून त्याचे नमुने अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांचेकडे पुढील तपासणीसाठी पाठविले आहेत. उपरोक्त चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत ऐरोली येथील सदर रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. भावना पगारे, स्त्रीरोग तज्ञ यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सोनम डोंगरे यांचे शवविच्छेदन कुटुंबाच्या विनंतीनुसार सर ज.जी.समूह रूग्णालये व ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे करण्यात येत आहे. तर रिचा मिश्रा यांच्यावर फोर्टीस रूग्णालय, वाशी येथे उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
अशाचप्रकारे 01 जुलै रोजी नेरुळ एल.पी. नाका पुलाखालील रस्त्यावर विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्यामुळे तेथून पायी जात असलेल्या दोन विद्यार्थींनींना विद्युत धक्का बसून अपघात घडला. दरम्यान दोन्ही विद्यार्थींनींना नागरिकांनी जवळच्या डी.वाय.पाटील रूग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात निगराणीसाठी फोर्टीस रूग्णालय, वाशी येथे दाखल केले आहे. सध्या दोन्ही विद्यार्थींनींची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी विदयुत विभागाचा हलगर्जीपणा असल्याचे आढळून आल्यामुळे प्रविण हिंदूराव गाडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विदयुत निरीक्षक, उदयोग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग ठाणे-1 यांची नियुक्ती केली आहे.
सदयस्थितीत पहिल्या घटनेतील रिचा मिश्रा व दुसऱ्या घटनेतील दोन विद्यार्थिनी या फोर्टीज हॉस्पीटल, वाशी येथे दाखल असून त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत आहे. तसेच त्यांच्यावरील उपचाराचा खर्च नवी मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार आरोग्य व विद्युत विभागातील संबंधित अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे.
सदरदुर्घटनांच्या पार्श्वभुमीवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी याप्रकरणी महापालिका आयुक्तांच्या दालनात ठाण मांडत निषेधाचा सूर आळवला. मनसेने मुख्यालयात आंदोलन करुन आयुक्त दालनात कपडे काढून पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला. राष्ट्रवादी काँ श.प. पक्षाने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. तर शिंदेसेनेने पालिका मुख्यालयात आक्रमक भुमिका घेत आयुक्त कैलास शिंदे यांना घेराव घातला. याप्रकरणी तत्काळ कारवाईची सर्वपक्षीयांकडून मागणी होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai