शासकीय महसूली जमा आता शंभर टक्के ऑनलाईन
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 03, 2026
- 15
जुनी चलन पद्धत पूर्णपणे बंद, शासनाचा मोठा निर्णय
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाने डिजिटल गव्हर्नन्सच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकत शासकीय महसूल जमा करण्याची पूर्वापार चालत आलेली भौतिक (कागदी) चलन पद्धत पूर्णपणे बंद केली आहे. राज्याचा सर्व प्रकारचा महसूल आता शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीनेच जमा केला जावा, या उद्दिष्टाची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे.
वित्त विभागाने जारी केलेल्या दि. 25 जून 2026 च्या शासन निर्णयानुसार 01 जुलै 2026 पासून बँका, अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागारांमार्फत कोणत्याही स्वरूपात भौतिक चलने स्वीकारली जाणार नाहीत. उपकोषागार कार्यालय, कोकण भवन यांनीही या संदर्भात स्पष्ट आदेश जारी करून सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना शासकीय रकमांचा भरणा केवळ ग्रास या ऑनलाईन प्रणालीद्वारेच भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासकीय तिजोरीत जमा होणाऱ्या रकमांचा भरणा नागरिकांना आणि प्रशासनाला सुलभतेने करता यावा, यासाठी राज्य सरकारने सन 2010 पासूनच ग्रास प्रणाली कार्यान्वित केली होती. या प्रणालीचे संपूर्ण व्यवस्थापन मुंबई येथील आभासी कोषागार कार्यालयाकडून पाहिले जाते. सद्यस्थितीत मुख्य लेखाशीर्ष 0020 ते 1475 या अंतर्गत येणारे सर्व प्रकारचे कर भरणे, महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या सेवांसाठी आकारण्यात येणारे शुल्क जमा करणे, शासनाने दिलेल्या कर्जावरील व्याजाचा भरणा करणे आणि शासन हमीची रक्कम जमा करणे यासारखी सर्व महत्त्वाची लेखाशीर्षे ग्रास प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बहुतांश विभागांच्या ऑनलाईन यंत्रणांचे या प्रणालीशी एकत्रीकरण (इंटिग्रेशन) पूर्ण झाले आहे.
प्रशासकीय पारदर्शकता आणि वेग वाढवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. या नवीन बदलाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ज्या क्षेत्रीय, विभागीय किंवा मुख्य कार्यालयांची नोंदणी अजूनही ग्रास प्रणालीवर झालेली नाही, त्यांना तातडीने नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा कोषागार अधिकारी आणि अधिदान व लेखा अधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार असून, सर्व कार्यालयांची नोंदणी वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या डिजिटल क्रांतीमुळे शासकीय स्तरावरील आर्थिक व्यवहारांना गती मिळणार असून मानवी चुका आणि विलंब टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai