प्लॅटफॉर्म तिकीदरांमध्ये वाढ

मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीदरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर 10 रुपये इतका होता. मात्र, आता या तिकीटासाठी 50 रुपये मोजावे लागतील. पुढील आदेश येईपर्यंत तिकीटाचे हे दर लागू राहणार आहेत. 

अनेकजण रेल्वे स्थानकांवर नातेवाईकांना सोडण्यासाठी जातात तेव्हा प्लॅटफॉर्म तिकीट काढतात. अनेकदा एका प्रवाशाला निरोप देण्यासाठी कुटुंबातील अनेकजण विनाकारण गर्दी करतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही बाब अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे गर्दी कमी करण्याच्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, मध्य रेल्वेने 17 मार्च ते 31 मार्च या कालावधीत लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकल सेवा सुरु ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी लोकल आणि बस सेवा बंद करावी, अशी अनेकांची मागणी आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.