राज्यात दुष्काळाचा ‘ट्रिगर-1’
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 26, 2026
- 29
राज्यात दुष्काळ जाहीर
‘ट्रिगर-1’मध्ये 265 तालुके; शेतकरी, शेतमजूरांना 12 प्रकारच्या सवलतींचा दिलासा
265 तालुके संकटात; शेतकऱ्यांसाठी 12 सवलतींचे कवच
मुंबई : पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीर दखल घेत राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-1’ लागू करून दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. राज्यातील 358 तालुक्यांपैकी तब्बल 265 तालुक्यांचा समावेश असल्याने मोठ्या भौगोलिक क्षेत्राला दुष्काळाच्या झळा बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, विद्यार्थी आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याचे कृषि आयुक्तांनी खरीप 2026 च्या हंगामाचा आढावा घेऊन राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार जूनपासून आतापर्यंतच्या पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांचा परिणाम झालेल्या 265 तालुक्यांमध्ये आता तातडीने पंचनामे आणि पीक परिस्थितीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस निर्देशांक संकलित करून अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये विशेष बाब म्हणून शासनाने 12 उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यांचा समावेश आहे. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांचे निकष शिथिल करून अधिकाधिक कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यकतेनुसार टँकरची व्यवस्था, शेतीपंपांची वीजजोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांना पुरेसा अन्नधान्य पुरवठा, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता, जलसंधारणाची कामे सुरू करणे तसेच पिण्याचे आणि पशुधनासाठी पाण्याचे नियोजन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
सहा महसूल विभागांतील तालुके दुष्काळाच्या छायेत
‘ट्रिगर-1’ लागू झालेल्या 265 तालुक्यांमध्ये ठाणे महसूल विभागातील 12, नाशिक विभागातील 49, पुणे विभागातील 35, छत्रपती संभाजीनगर विभागातील 74, अमरावती विभागातील 56 आणि नागपूर विभागातील 39 तालुक्यांचा समावेश आहे. ठाणे महसूल विभागात रायगडमधील श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर व राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या तालुक्यांना ‘प्रथम कळ’ लागू झाली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा या यादीत समावेश नाही. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांतील 74 तालुक्यांना ‘ट्रिगर-1’ लागू झाला असून, या विभागातील परिस्थिती विशेष लक्षवेधी आहे. मराठवाड्यातील 76 पैकी 74 तालुके या प्रक्रियेत आले आहेत.
पंचनाम्यांनंतर पीक नुकसानीची स्वतंत्र मदत
पीक नुकसानीची आर्थिक मदत अद्याप या निर्णयातून निश्चित करण्यात आलेली नाही. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पंचनामे आणि पीक परिस्थितीचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर, विहित कार्यपद्धतीची पूर्तता करून स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे पीक नुकसानीची मदत जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या दुष्काळी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर दुष्काळी परिस्थितीबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता शासन निर्णयानंतर जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि ग्रामीण भागाला तातडीचा दिलासा देण्याबरोबरच प्रत्यक्ष नुकसानीचे अचूक सर्वेक्षण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची ग्वाही
पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पंचनामे व पाहणीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी शेतकरी व महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. राज्य शासन या संकटात पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. सर्वतोपरी मदत केली जाईल, असा धीर देत दिलासा दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai