गायकवाड यांचे निलंबन रद्द; गाडेंना मात्र दणका
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2026
- 25
लाचप्रकरणातील आरोप कायम असतानाच उपायुक्तांना दिलासा; विद्युत विभागातील कंत्राटांच्या चौकशीसाठी तदर्थ समिती
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या तहकूब महासभेत दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. लाचप्रकरणी निलंबित करण्यात आलेले अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांचे निलंबन कायम ठेवण्यात आले. गाडे यांच्या कार्यकाळातील विविध कामे आणि कंत्राटांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही महापौर सुजाता पाटील यांनी दिले. त्यामुळे एकाच महासभेत एका अधिकाऱ्याला दिलासा, तर दुसऱ्या अधिकाऱ्याभोवती चौकशीचा फास आवळल्याचे चित्र दिसून आले.
अतिक्रमण विभागातील एका कंत्राटदाराचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी 42 हजार रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. कैलास गायकवाड यांना महापालिका मुख्यालयात रक्कम स्वीकारताना पकडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि महापालिका प्रशासनाने निलंबित केले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. महासभेतील विषय क्रमांक 11 वर चर्चा सुरू असताना सभागृहनेते सागर नाईक यांनी हा विषय मांडला. माजी महापौर जयवंत सुतार यांनी गायकवाड यांचे निलंबन रद्द करून त्यांना अतिक्रमण विभाग वगळता अन्य विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत करण्याची सूचना केली. महापौर सुजाता पाटील यांनी ही सूचना मंजूर झाल्याचे जाहीर केले. त्यानुसार गायकवाड यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, निलंबन रद्द झाल्याने त्यांच्यावरील लाचप्रकरणातील आरोप संपुष्टात आलेले नाहीत.
विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांच्या निलंबनाचा विषय चर्चेला आला असता, त्यांच्या कार्यपद्धतीसह विभागातील विविध कंत्राटांच्या व्यवहारांवर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. नेरूळ येथे 1 जुलै 2025 रोजी उघड्या विद्युत तारांमुळे दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का बसल्याच्या घटनेनंतर गाडे यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही ते कार्यरत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावर अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी स्पष्टीकरण देताना गाडे यांना 2 जुलै रोजी निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. विद्युत निरीक्षक आणि शहर अभियंत्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी त्यांचे निलंबन संपुष्टात आणले होते. तसेच या प्रकरणाची सविस्तर विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिल्यानंतर गाडे पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते.
महासभेतील चर्चेदरम्यान गाडे यांच्या कार्यकाळातील कामांवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सदस्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची दखल घेत महापौर सुजाता पाटील यांनी प्रवीण गाडे यांचे निलंबन कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्यासाठी हा विषय तदर्थ समितीकडे सोपवून सविस्तर प्रस्ताव पुन्हा महासभेसमोर आणण्याचे निर्देश त्यांनी दिले. विशेष म्हणजे, चौकशी पूर्ण होईपर्यंत गाडे यांना अन्य कोणत्याही विभागातही कामावर ठेवू नये, असे महापौरांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील विद्युत कामे, कंत्राटांचे व्यवहार आणि कथित अनियमिततांची चौकशी आता महत्त्वाची ठरणार आहे. एका बाजूला गायकवाड यांचे निलंबन रद्द झाल्याने त्यांना दिलासा मिळाला, तर दुसऱ्या बाजूला गाडे यांचे निलंबन कायम राहिल्याने महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या कारभारावरून नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai