आपत्तीला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2026
- 23
एनडीआरएफ आणि महापालिका अग्निशमन दलाची बचावकार्य प्रात्यक्षिके; आपत्कालीन मदतकार्य करणाऱ्यांचा सन्मान
सोसायट्या, शाळा-महाविद्यालयांत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यावर भर
नवी मुंबई : कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क आणि सज्ज राहणे आवश्यक आहे. आपत्तीच्या प्रसंगी स्वतःचा बचाव करण्यासोबतच इतरांनाही मदत करण्याची मानसिकता प्रत्येकाने जोपासावी, असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी केले. आंतरराष्ट्रीय आपत्ती धोका निवारण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित विशेष जागरूकता कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
‘सज्जता, तंत्रज्ञान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून आपत्ती सक्षम नवी मुंबईची निर्मिती’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आपत्कालीन बचावकार्याची प्रात्यक्षिके सादर केली. आपत्तीच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे आणि उपकरणांचे प्रदर्शनही भरविण्यात आले. महापौर पाटील यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने सोसायट्या, वसाहती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन आपत्तीच्या वेळी घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपाययोजनांची प्रात्यक्षिकांसह माहिती द्यावी, असे निर्देश दिले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरी भागात आगीच्या घटना वाढत असल्याचे नमूद केले. वाशीतील एका दुर्घटनेचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, अस्ताव्यस्त पार्किंग केलेल्या वाहनांमुळे घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन वाहनाला उभे राहण्यासाठी जागा मिळत नव्हती. त्यामुळे बचावकार्यात महत्त्वाचा वेळ गेला. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी अग्निशमन वाहनांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर वाहने उभी करू नयेत. अग्निशमन विभागाने सोसायट्यांमध्ये बैठका घेऊन आग प्रतिबंधक उपाययोजना आणि सुरक्षेच्या नियमांबाबत जनजागृती करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. एल-निनोचा प्रभाव आणि हवेतील वाढता उष्मा लक्षात घेता संभाव्य संकटांबाबतही सतर्क राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उपमहापौर दशरथ भगत यांनी आपत्ती आल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच जागरूकता आणि तयारी असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करताना नागरिकांमुळे बचाव पथकांना अडथळे निर्माण होणार नाहीत, याचीही प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे त्यांनी नमूद केले. शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना शिस्त आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात एनडीआरएफच्या जवानांनी आपत्कालीन परिस्थितीत शोध व सुटका मोहीम कशी राबवावी, आपत्तीग्रस्त नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढावे आणि त्यांना प्राथमिक उपचार कसे द्यावेत, याची प्रात्यक्षिके सादर केली. महापालिका अग्निशमन दलानेही बचावकार्याच्या विविध पद्धतींचे सादरीकरण केले. महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर एनडीआरएफ आणि अग्निशमन दलातर्फे बचावकार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे व उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले. महापौर, उपमहापौर, आयुक्त, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली.
- बचावकार्य करणाऱ्यांचा सन्मान
आपत्कालीन परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महापालिका अग्निशमन दलातील अधिकारी व जवान, महापालिका कर्मचारी आणि नेरूळ एलपी जंक्शन येथे विजेचा धक्का लागलेल्या दोन मुलींना मदत करणारे नागरिक प्रवीण महाले यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.आपत्ती व्यवस्थापन विषयावरील शालेय चित्रकला स्पर्धेतील प्राथमिक आणि माध्यमिक विभागांतील प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांनाही प्रशस्तिपत्रे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापनाचे राष्ट्रीय प्रशिक्षक योगेश परदेशी यांनी ‘समुदाय आधारित आपत्ती जोखीम निवारण व नागरिकांचा सहभाग’ या विषयावर मार्गदर्शन केले. तज्ज्ञ मार्गदर्शक अंबिका डबराल यांनी शालेय स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे यांनी नवी मुंबई महापालिकेची यंत्रणा आपत्कालीन मदतकार्यासाठी सदैव सज्ज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, उपआयुक्त स्मिता काळे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव, एनडीआरएफचे नियंत्रक अधिकारी गौरव चौहान व अरुण कुमार, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव, आगाखान एजन्सी हॅबिटॅट संस्थेच्या प्रतिनिधी अमृता पराडकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai