पालिकेच्या लोककल्याणकारी योजना होणार ऑनलाइन
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2026
- 28
अर्जापासून थेट बँक खात्यात लाभ जमा होईपर्यंतची प्रक्रिया डिजिटल करण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महिला, बालके, मागासवर्गीय घटक, विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व लोककल्याणकारी योजनांची प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. योजनांचे अर्ज दाखल करण्यापासून ते लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना योजनांचा लाभ अधिक सुलभतेने आणि पारदर्शकपणे घेता येणार आहे.
महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना आयुक्तांनी हे निर्देश दिले. शासन निर्देशित 68 लोकसेवा आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या अन्य सेवांसह एकूण 141 सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर महापालिकेच्या सर्व कल्याणकारी योजनांची प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महापालिकेची सभागृहे, मैदाने आणि विविध जागा कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याची आरक्षण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच लाभार्थ्यांकडून घेतली जाणारी अनामत रक्कम परत करण्याची प्रक्रियाही ऑनलाइन आणि गतिमान करण्यावर भर देण्यात आला. यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने सातत्याने पाठपुरावा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून घेतल्या जाणाऱ्या औषधांच्या साठ्यावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. औषधसाठा व्यवस्थापनासाठी ऑनलाइन प्रणाली अधिक सक्षम करण्याची गरज आयुक्तांनी अधोरेखित केली. या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
शहरातील पदपथ अडथळामुक्त करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश देताना परवानाधारक स्टॉलधारकांसाठी पर्यायी जागांची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. त्याचबरोबर अनधिकृत स्टॉलवर धडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. पदपथांचे जिओ-टॅगिंग करण्यासह संपूर्ण महापालिका क्षेत्रातील पदपथांची रस्त्यापासूनची उंची तपासण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. रस्त्याच्या कडेला असलेल्या वॉटर गॅन्ट्रीजची उंची पाण्याचा निचरा सुरळीत होईल, अशा पद्धतीने ठेवण्यावरही भर देण्यात आला. विद्युत खांबांवरील साहित्य आणि केबल चोरीच्या घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उपलब्धता वाढविण्यासह अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा शोध घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
वायुप्रदूषण नियंत्रणासाठी सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग, आम्र मार्ग, साऊथ सेंट्रल रोड आणि पाम बीच मार्ग यांसारख्या प्रमुख रस्त्य ांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. यांत्रिक वाहनांद्वारे स्वच्छतेसोबत ब्रशिंग करण्यावरही भर देण्यात आला. बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या जड-अवजड वाहनांमधून साहित्य रस्त्यावर सांडल्याने धूळ आणि वायुप्रदूषण वाढत असल्याने महापालिकेच्या डेब्रिज भरारी पथकांनी अधिक काटेकोर नियंत्रण ठेवावे, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) तपासणी नाके सक्षमपणे सुरू ठेवण्याबाबत पत्र पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांसंदर्भातील मार्गदर्शक सूचना आतापासूनच जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले. सणासुदीच्या काळात प्रदूषण नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करण्यावर आयुक्तांनी भर दिला. नागरिकांकडून पब्लिक ग्रिव्हन्स प्रणाली तसेच अन्य माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि सूचनांचे विहित मुदतीत निराकरण करण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखाने दर आठवड्याला आढावा घ्यावा, असे निर्देश देण्यात आले. माहितीच्या अधिकारांतर्गत प्राप्त अर्जांनाही वेळेत उत्तरे देण्याबाबत दक्षता घेण्यास आयुक्तांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai