पोलादपूरचे सरकारी वसतिगृह आता खारघरमध्ये
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2026
- 30
1.38 कोटींच्या भूखंड खरेदीला सामाजिक न्याय विभागाची मंजुरी
उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार आधार
नवी मुंबई : नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील उच्च शिक्षण संस्थांचे विस्तृत जाळे लक्षात घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी खारघर येथे सरकारी वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलादपूर येथे मंजूर झालेले मुलांचे शासकीय वसतिगृह आता खारघर सेक्टर 5 मध्ये उभारण्यात येणार आहे. यासाठी 1,177 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड 1 कोटी 38 लाख 29 हजार 799 रुपयांना खरेदी करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे उच्च शिक्षणासाठी नवी मुंबई परिसरात येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
पोलादपूरमध्ये जागा, पण विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीपोलादपूर येथे मुलांचे शासकीय वसतिगृह उभारण्यास 28 जून 2007 रोजी मंजुरी देण्यात आली होती. मात्र, या तालुक्यात शाळा आणि महाविद्यालयांची संख्या मर्यादित असून व्यावसायिक महाविद्यालयही उपलब्ध नसल्याने वसतिगृहातील सर्व जागा भरल्या जाण्याबाबत साशंकता होती. परिणामी, मंजुरी मिळूनही हे वसतिगृह सुरू होऊ शकले नाही.दुसरीकडे, खारघर, पनवेल आणि नवी मुंबई परिसरात व्यावसायिक तसेच बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. येथे शिक्षणासाठी रायगड जिल्ह्यासह विविध भागांतून विद्यार्थी येतात. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना खासगी निवासाची व्यवस्था करणे परवडत नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या जवळ सरकारी वसतिगृह उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. याच पार्श्वभूमीवर पोलादपूरचे मंजूर वसतिगृह खारघरमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
85 टक्के जागा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी
मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमधील एकूण प्रवेशक्षमतेच्या 85 टक्के जागा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. 2018 पासून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देता येत नसल्याने, विद्यार्थ्यांची संख्या कमी असलेल्या भागात वसतिगृहाच्या सर्व जागा भरण्याचे आव्हान निर्माण होऊ शकते. पोलादपूरमधील वसतिगृहाच्या स्थलांतरामागेही ही बाब महत्त्वाची ठरली.
खारघर, बेलापूर, नेरूळमध्ये उच्च शिक्षणाच्या संधी
खारघर, बेलापूर आणि नेरूळ परिसरात अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, फॅशन तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या 50 हून अधिक उच्च शिक्षण संस्था आहेत. यामध्ये भारती विद्यापीठ, पिल्लई महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, तेरणा महाविद्यालय, राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था, एनएमआयएमएस, एसआयईएस आणि आयटीएम यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. या शैक्षणिक केंद्रांच्या परिसरात सरकारी वसतिगृह उभारल्यामुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा मिळण्याबरोबरच शिक्षण सुरू ठेवणे अधिक सुलभ होणार आहे. भूखंड खरेदीला मंजुरी मिळाल्याने वसतिगृह उभारणीच्या प्रक्रियेला चालना मिळाली असून, आता प्रत्यक्ष बांधकाम आणि वसतिगृह सुरू होण्याच्या पुढील कार्यवाहीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai