पनवेलकरांसाठी लवकरच स्वतंत्र बससेवा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2026
- 31
100 बस खरेदीला मंजुरी 287.55 कोटींचा परिवहन प्रकल्प; 68 बसथांबे, पाच ठिकाणी बस आगार उभारणार
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीवरील वाढता ताण लक्षात घेता महापालिकेने स्वतंत्र बससेवा सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत स्वतंत्र बससेवेचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. या प्रस्तावानुसार 100 बस खरेदी करणे, 68 बसथांबे उभारणे, बस आगार आणि चार्जिंग केंद्रांची व्यवस्था करणे यांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी 287.55 कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च निश्चित करण्यात आला आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीलगत वाढणारी लोकसंख्या आणि एनएमटी व बेस्टच्या विद्यमान बससेवेची अपुरी क्षमता लक्षात घेऊन महापालिकेने विशेष अभ्यास समिती नेमली होती. या समितीने संपूर्ण परिसरासाठी स्वतंत्र परिवहन उपक्रमाची आवश्यकता व्यक्त केली. त्यानंतर स्वतंत्र बससेवेचा प्रस्ताव सभेपुढे मांडण्यात आला. महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपायुक्त अभिषेक पराडकर आणि परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी प्रस्तावाचे सादरीकरण केले.इलेक्ट्रिक बससोबत गॅस बसचाही पर्यायप्रस्तावाला मंजुरी देताना सदस्यांनी बसच्या प्रकाराबाबत आणि इंधनाच्या पर्यायांबाबत काही उपसूचना मांडल्या. सर्व 100 बस विजेवर चालणाऱ्या खरेदी करण्याऐवजी त्यापैकी निम्म्या बस गॅसवर चालणाऱ्या असाव्यात, अशी सूचना काँग्रेसचे सदस्य लतिफ शेख यांनी केली. इतर महापालिकांच्या परिवहन उपक्रमांना आलेला अनुभव तपासून बस खरेदीचा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सुचवले.
पनवेल शहरातील अरुंद रस्त्यांचा विचार करून कमी लांबीच्या बस खरेदी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, प्रवाशांची संख्या अधिक असलेल्या मार्गांवर डबलडेकर बस सुरू करण्याचा पर्याय तपासावा, अशी सूचना शिवसेनेच्या (शिंदे गट) सदस्या सायली सरक यांनी मांडली. कर्नाळा आणि इतर पर्यटनस्थळांपर्यंतही डबलडेकर बससेवा सुरू करण्याचा विचार व्हावा, असे त्यांनी नमूद केले. या सूचनांच्या अनुषंगाने बसचा प्रकार, आकार आणि इंधनाचा पर्याय यांचा विचार करून पुढील नियोजन केले जाणार आहे.
असा आहे 287.55 कोटींचा प्रस्ताव
महापालिकेच्या स्वतंत्र बससेवा प्रकल्पासाठी अपेक्षित खर्चाचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.
- 100 बस खरेदी : 150 कोटी रुपये
- 68 बसथांबे उभारणी : 8.15 कोटी रुपये
- बस आगार उभारणी : 30 कोटी रुपये
- 76 चार्जिंग केंद्रे : 8.40 कोटी रुपये
- इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम : 86 कोटी रुपये
या प्रकल्पांतर्गत महापालिका क्षेत्रातील आरक्षित जागांवर पाच ठिकाणी बस आगार उभारण्याचे नियोजन आहे. बससेवेवरील वाहक महापालिकेचे असतील. तसेच प्रत्यक्षात जितक्या बस धावतील, त्यानुसारच संबंधित यंत्रणेला पैसे अदा केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
- ग्रामीण भागासाठी लहान बसचा विचार
महापालिका क्षेत्रातील सुमारे सहा ते आठ टक्के भाग ग्रामीण स्वरूपाचा असून, या भागात 12 ते 15 टक्के नागरिक राहतात. त्यामुळे संपूर्ण महापालिका क्षेत्रातील नागरिकांना बससेवेचा लाभ मिळावा, यासाठी लहान बसची उपलब्धता महत्त्वाची ठरणार आहे. या भागातील रस्ते आणि प्रवाशांची गरज लक्षात घेऊन आणखी लहान बस घेण्याबाबत सल्लागाराला सूचना देण्यात येतील. त्यानुसार अहवालात आवश्यक दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली.
- चार्जिंगसाठी स्वस्त वीज मिळण्याची अपेक्षा
महापालिकेच्या बससेवेचा खर्च कमी करण्यासाठी वीजपुरवठ्याचाही विचार करण्यात आला आहे. सिडकोच्या सहकार्याने वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प उभारला जात असून, त्यातून महापालिकेला प्रतियुनिट पाच रुपये दराने वीज मिळण्याची अपेक्षा आहे. या विजेचा वापर बस चार्जिंगसाठी केल्यास खर्चात बचत होऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले. इलेक्ट्रिक बसच्या बॅटरीची क्षमता दरवर्षी सुमारे 20 टक्क्यांनी कमी होत असल्याने सहा वर्षांनंतर बॅटरी बदलण्याची गरज भासू शकते. त्यामुळे बसच्या देखभालीचा आणि दीर्घकालीन खर्चाचाही विचार करून नियोजन केले जाणार आहे. केंद्र सरकारने पर्यावरणपूरक बससेवेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर केली असून, या योजनेंतर्गत देशभरातील 4,700 बसची निविदा प्रक्रिया झाल्याची माहिती सभेत देण्यात आली. मुंबई महानगर प्रदेशातील शहरांची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन महापालिकेने हा प्रस्ताव तयार केला आहे. पनवेलमधील स्वतंत्र बससेवेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मात्र, बसचा अंतिम प्रकार, इंधनाचा पर्याय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचे नियोजन याबाबत पुढील निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai