पालिकेत सर्वांना समान 45 हजारांचा दिवाळी बोनस
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2026
- 32
अधिकारी, कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव नाही; 4,961 कर्मचाऱ्यांना लाभ, पालिकेच्या तिजोरीवर 22.32 कोटींचा भार
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अधिक गोड होणार आहे. महापालिकेतील कायम, कंत्राटी, ठोक मानधनावरील कर्मचारी तसेच अधिकारी अशा सर्वांनाच पदाचा किंवा सेवेच्या प्रकाराचा भेदभाव न करता प्रत्येकी 45 हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. सभागृह नेते सागर नाईक यांनी हा प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर मांडला होता. या निर्णयामुळे महापालिकेच्या विविध विभागांतील सुमारे 4 हजार 961 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समान बोनसचा लाभ मिळणार असून, यासाठी महापालिकेला 22 कोटी 32 लाख 45 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.
दिवाळी बोनस देताना कर्मचाऱ्याचे पद, सेवेचा प्रकार आणि नियुक्तीची पद्धत यानुसार सानुग्रह अनुदानाची रक्कम निश्चित केली जाते. त्यामुळे कायम कर्मचारी, अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या रकमेत मोठी तफावत असते. मात्र, यंदा ही पद्धत बाजूला ठेवत सर्वांना समान रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, ठोक मानधनावरील कर्मचारी आणि अधिकारी यांना प्रत्येकी 45 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाल्याने कर्मचाऱ्यांमधील बोनसची तफावत दूर होणार आहे. गेल्या वर्षी महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी, कायम कर्मचारी आणि नियमित शिक्षक यांना प्रत्येकी 34 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. करार पद्धतीने काम करणारे कर्मचारी आणि विविध योजनांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना 28 हजार 500 रुपये, तर कोविड व नॉन-कोविडअंतर्गत काम करणारे कर्मचारी, घड्याळी तासिका शिक्षक आणि अंशकालीन निदेशक यांना 18 हजार 500 रुपये देण्यात आले होते.यंदा सर्वांनाच 45 हजार रुपये मिळणार असल्याने गेल्या वर्षी 34 हजार 500 रुपये मिळालेल्या कर्मचाऱ्यांना 10 हजार 500 रुपये अधिक मिळतील. 28 हजार 500 रुपये मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या रकमेत 16 हजार 500 रुपयांची, तर 18 हजार 500 रुपये मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या रकमेत तब्बल 26 हजार 500 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे कमी बोनस मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना यंदा मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समान बोनस देण्याच्या निर्णयामुळे सुमारे 4 हजार 961 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. या निर्णयासाठी महापालिकेच्या तिजोरीवर 22 कोटी 32 लाख 45 हजार रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. पद आणि नियुक्तीच्या प्रकारानुसार बोनसची रक्कम ठरवण्याऐवजी सर्वांना समान सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai