मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग भेसळीला बंदी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2026
- 33
मुंबई : बाजारात मिळणाऱ्या दैनंदिन खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील मसाल्यांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीबाबत अत्यंत कडक नवीन नियमावली जारी केली आहे.
या नियमांनुसार मसाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम रंगांचा वापर करणे आणि परकीय पदार्थांची भेसळ करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
मसाल्यांना आकर्षक आणि गडद रंग आणण्यासाठी अनेक व्यावसायिक लाल तिखट, हळद, धने पूड आणि गरम मसाल्यांमध्ये विषारी रासायनिक रंग तसेच स्टार्च, लाकडाचा भुसा यांसारख्या पदार्थांची भेसळ करतात. असे भेसळयुक्त मसाले खाल्ल्याने पोटाचे विकार, यकृत व किडनीचे आजार तसेच कर्करोगासारखे गंभीर आजार जडण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार ठरवून दिलेल्या गुणवत्तेच्या निकषांचे 100 टक्के पालन करणे सर्व उत्पादकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
नवीन नियमावलीनुसार, एफडीएची भरारी पथके राज्यातील मसाला उत्पादन कारखाने, गिरण्या आणि दुकानांवर अचानक छापे टाकून मसाल्यांचे नमुने तपासणीसाठी गोळा करणार आहेत. प्रयोगशाळा तपासणीत कोणत्याही मसाल्यामध्ये बंदी असलेले रंग किंवा अखाद्य घटकांची भेसळ आढळल्यास संबंधित कंपनीचा अन्न परवाना तात्काळ रद्द केला जाईल. तसेच अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दोषींवर थेट फौजदारी खटले दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यंत्रणेला दिले आहेत. सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना शुद्ध व दर्जेदार मसाले मिळावेत यासाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai