गणेश नाईकांना सोमनाथ केकाण यांच्या वाकुल्या
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2026
- 34
गुडविलसाठी कार्यमुक्त करुनही ओसी, सीसीवर मोहोर
नवी मुंबई ः सहायक संचालक सोमनाथ केकाण यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन महापालिकेने त्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव पारित केला होता. परंतु, पालिका आयुक्तडॉ. कैलास शिंदे यांनी अद्याप त्या ठरावावर अमंलबजावणी केली नसून केकाण यांच्याकडेच नगररचना विभागाचा कार्यभार कायम ठेवला आहे. नियुक्ती प्राधिकरणाने ठराव मंजुर करुनही केकाण यांचे बांधकाम व भोगवटा परवानग्यांवर मोहोर उठवणे सुरुच असल्याने सत्ताधारी गटात अस्वस्थता पसरली आहे. मंत्री गणेश नाईक केकाण यांच्या कार्यपद्धतीचे जाहीर वाभाडे काढत असताना केकाण मात्र नाईकांना वाकुल्या दाखवत पालिकेत पाय रोवून ठाम उभे आहेत. केकाण यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून शेरास सव्वा शेर भेटल्याची चर्चा मंत्रालयात आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशीतील नैवेद्य व अलबेला या शिंदेसेनेतील नेत्यांच्या प्रभागातील इमारतींवर कारवाई करण्याची मागणी नगररचना विभागाकडे केली होती. याउलट नगररचना विभागाचे सहायक संचालक सोमनाथ केकाण यांनी लोकनाथांच्या इशाऱ्यावर संबंधित इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र बहाल केले. त्यामुळे चिडलेल्या सत्ताधाऱ्यांनी याबाबत सर्वसाधारण सभेत संबंधित प्रकरणांवर चर्चा करुन केकाण यांच्या कार्यमुक्तीचा ठराव पारित केला. दरम्यान, पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी याबाबत चौकशी समिती नेमून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले. चौकशी समितीने या प्रकरणात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा अहवाल पालिकेला सादर केला. पालिकेने पारित केलेला ठराव आयुक्त शिंदे यांनी नगरविकास विभागाकडे पाठवला असता तुर्त केकाण यांची उलचबांगडी करण्यास असमर्थता दर्शवली.
अनेक प्रयत्न करुनही केकाण यांना हटविण्यास गणेश नाईक यांना अपयश आले असून ते आपली भडास अनेक सार्वजनिक कार्यक्रमात प्रामुख्याने जनता दरबारात काढत आहेत. मागील सर्वसाधारण सभेत केकाण यांच्या कार्यमुक्तीचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला असता सत्ताधाऱ्यांनी त्यावर तोंडसुख घेतले व केकाण यांना पालिकेत येण्यास मज्जाव करण्याचा इशारा दिला. तरीही केकाण यांनी नाईकांना वाकुल्या दाखवत आपली मोहोर उठवणे सुरुच ठेवले असून त्यातून त्यांनी मोठे ‘गुडविल’ पालिका आयुक्त यांच्यासमोर उभे केल्याची चर्चा आहे. पालिका आयुक्त शिंदे हे केकाण यांच्या धाडसी कार्यपद्धतीवर कमालीचे खुश असून त्यांनी या कार्यशैलीमुळे मोठे गुडविल आयुक्तांच्या नजरेत मिळवले आहे. आतापर्यंत गणेश नाईक सांगतील तसेच महापालिकेत घडत होते परंतु, सहायक संचालक सोमनाथ केकाण यांनी प्रथमच नाईक यांच्या एकाधिकारशाहीला फाटा देऊन अप्रत्यक्षपणे त्यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे.
- प्रधान सचिवांना भेटणार?
नियुक्ती प्राधिकरण नवी मुंबई महापालिका असताना केकाण यांना त्यांच्या मुळ विभागात परत पाठवण्याचा ठराव मंजुर होऊनही शासनाने त्याबाबत आदेश पारित न केल्याने नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील भाजपच्या 55 नगरसेवकांना घेऊन नगरविकास प्रधान सचिव असीम गुप्ता यांना भेटणार असल्याचे सुत्रांकडून कळत आहे. याबाबत संबंधित विभागाने केकाण यांची बदली न केल्यास मंत्रालयातच आंदोलन करण्याचे निश्चित केल्याचे सुत्रांकडून कळत आहे. - मंत्रिमंडळाच्या बैठकीत गाजणार नाथांची गाथा
केकाण यांनी दिलेल्या बेकायदेशीर मंजुऱ्या, नगरविकास विभागाच्या आदेशावर विकास आराखड्यातील हटविलेली अनेक आरक्षणे तसेच केकाण यांच्या कार्यमुक्तीचा ठराव पारित होऊनही नगरविकास विभागाची सुरु असलेली मनमानी याबाबत वनमंत्री गणेश नाईक मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर विषय उपस्थित करणार असल्याचे कळत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणते आदेश नगरविकास प्रधान सचिव असीम गुप्ता यांना देतात त्यावर सत्ताधारी पुढील रणनिती ठरवणार असल्याचे बोलले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai