राज्यात 52 कोरोनाबाधित

पाच जण डिस्चार्जच्या मार्गावर

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारपर्यंत 52 असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तीन नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कोरोनासंदर्भातील सद्यःपरिस्थितीची माहिती दिली. दिलासादायक बाब म्हणजे या 52 पैकी पाच जण डिस्चार्ज मिळण्याच्या मार्गावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाबाधित जे रुग्ण दाखल झाले होते, उपचारानंतर या पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या पाच जणांना आज डिस्चार्ज दिला जाईल. याचाच अर्थ रुग्ण बरा होतो. मात्र, त्यांना सात ते आठ दिवस विलगीकरणात राहावे लागेल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण लॅब टेस्टिंगची संख्या दिवसाला 2400 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या आपण सहा लॅबमध्ये तपासणी करत आहोत, येत्या काही दिवसांत ही संख्या 12 होईल, असे त्यांनी सांगितले.