गावात येणार्‍यांशी सौजन्याने वागा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई ः कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता अनेकांनी गावची वाट धरली आहे. मात्र, शहरातून येणार्‍या लोकांना ग्रामस्थांकडून विरोध होताना दिसत आहे. आपलं राज्य सुसंस्कृत राज्य आहे. त्यामुळे गावात आलेल्या नागरिकांसोबत माणुसकीचं वर्तन झाले पाहिजे, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. गावात येणारी माणसंही आपलीच आहेत. ते कोणत्याही बाधित देशातून आलेली नाही. त्यामुळे त्यांच्याशी सौजन्याने वागण्याची विनंती टोपे यांनी केली. राज्यातील कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गुढीपाडवासणाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहून सरकारने राज्यात सोमवारी संचारबंदी लागू केली. मात्र, शहरी भागात अजूनही गर्दी कमी होताना दिसत नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. आपल्याला एकमेकांमध्ये अंतर राखणं गरजेचंआहे. त्यामुळे सरकारच्या सूचनांचे पालन करण्यासही त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांत गावाकडे जाणार्‍या लोकाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे गावकरी अशा लोकांकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. तर, अनेक ठिकाणी गावांनी आपल्या सीमा बंद केल्याचे पाहायला मिळाले आहे. यावर गावात आलेले लोक पण आपलेच आहेत. त्यांच्याशी माणुसकीने वागण्याचा सल्ला राजेश टोपे यांनी दिला. अशा लोकांमध्ये काही लक्षणं आढळल्यास त्यांना रुग्णालयात घेऊन जावं पण गावात येऊन देणार नाही, अशी भूमिका घेणं हे राज्याला शोभणारं नसल्याचं त्यांनी सांगितले.