उद्धव ठाकरे यांची मोदींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा

मुंबई : वाढत जाणार्‍या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनद्वारे चर्चा झाली असल्याची माहिती आहे. कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासंदर्भात सुरू असलेल्या उपाय योजनांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दिल्लीतील तब्लिघी ए जमातचे सदस्य महाराष्ट्रात आले आहेत. त्यांचा शोध घेऊन विलगीकरण करण्या संदर्भात महत्वाची चर्चा झाली.

दिल्लीतील ताब्लिक इ जमातच्या मरकझ मध्ये मराठवाड्यातून मोठ्या संख्येने लोक गेल्याचे पुढे आले आहे. मात्र आरोग्य यंत्रणांना त्याचा थांगपत्ताही नव्हता. दरम्यान हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर आता शोधाशोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार औरंगाबादचे 43 लोक सहभागी झाले होते, त्यातील 29 लोकांना क्वारन्टाइन करण्यात आले आहे.

संबंधित लोकांमध्ये सध्या तरी कुठलीही लक्षण नाहीत. तर इतरांचीही प्रकृती बरी आहे. फक्त औरंगाबाद नाही तर नांदेडचे 13, उस्मानाबादचे 8 हिंगोलीचे 2, परभणीचे 2 , जालनाचे 5 रहिवासी आहेत. यापैकी बहुतांश जणांना क्वारन्टाइन करण्यात आलं आहे. दिल्लीत एका लग्नात गेलेल्या 6 जणांनाही क्रांती चौक पोलिसांनी तपासणीसाठी पाठवले आहे. हे लोक एक महिना दिल्लीत होते. 27 तारखेला ते परत आले. आता त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे, तर 2 जण बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू आहे.