नियम न पाळणार्यांकडून 35 लक्ष दंड वसूली
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 05, 2020
- 750
नवी मुंबई ः लॉकडाऊननंतर ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टप्प्याटप्प्याने विविध गोष्टींना सुरूवात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या नियमांचे काही नागरिकांकडून उल्लंघन होताना दिसते. अशा बेजबाबदारपणे वागणार्या नागरिकांना स्वयंशिस्त लागावी व समज मिळावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 35 लाखाहून अधिक दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
कोरोनावर विशिष्ट लस अथवा औषध उपलब्ध नसल्याने सध्यातरी सुरक्षित नियमांचे पालन हाच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचे काटेकोर पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकत्याच एपीएमसी मार्केटला दिलेल्या धडक भेटीतही कोणावर मुद्दामहून कारवाई नाही पण जे आरोग्याविषयी बेफिकिरी दाखवतील आणि स्वत:सह इतरांचे आरोग्य धोक्यात आणतील त्यांना शिस्त लावणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले होते.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अतिशय गरजेच्या अशा सुरक्षा नियमांचे पालन न करणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याकरिता विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत नियम मोडणार्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे प्रबोधनही करण्यात येत आहे. त्यासोबतच या नागरिकांना समज मिळावी म्हणून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या कारवाईतून आत्तापर्यंत 35 लाख 50 हजार 950 रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या व्यक्तीकडून रू. 1 हजार, मास्क न लावणा-या व्यक्तीकडून रू. 500, सुरक्षित अंतर न पाळणार्या व्यक्तीकडून रू. 200 व सुरक्षित अंतराचे नियम मोडणार्या व्यापारी/दुकानदार यांचेकडून रू. 2 हजार अशाप्रकारे दंड वसूल करण्यात येत आहे. आपल्याला दंडात्मक रक्कम भरावी लागू नये याकरिता तरी नागरिकांनी आपल्या व इतरांच्या आरोग्यासाठी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे ही त्यामागील भूमिका आहे. यापुढील काळात नागरिकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि महानगरपालिकेला दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये असे सूचित करतानाच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आपल्याला व आपल्यामुळे कुटुंबियांना व इतरांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या 26 व्यक्तींकडून रू. 26 हजार,
मास्क न लावणार्या 3424 व्यक्तींकडून रू. 16 लक्ष 48 हजार 650,
सुरक्षित अंतर न पाळणार्या 2242 व्यक्ती / व्यापारी, दुकानदार यांचेकडून रू. 18 लक्ष 76 हजार 300,
अशाप्रकारे एकूण 35 लाख 50 हजार 950 रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai