अन्नत्याग करुन पवारांचा निलंबित खासदारांना पांठिबा

मुंबई : कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेल्या आठ खासदारांनी अन्नत्याग केला आहे. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राज्यसभेच्या उपसभापतींसह केंद्र सरकारच्या कृषी धोरणावरही प्रश्‍न उपस्थित केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ’कृषी विधेयक घाई घाईने मांडले असून त्यावर चर्चा करणे गरजेचं होतं, अशी भूमिका मांडली आहे. तसंच, आठ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे हे अयोग्य आहे, असं म्हणत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षाचे खासदार उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांना वारंवार नियमाचे पुस्तक दाखवत होते. पण उपसभापतींनी त्याकडे दुर्लक्ष केले. खासदार नियमाचे पुस्तक दाखवत असताना उपसभापतींनी त्यांचे ऐकायला पाहिजे होते. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत उपसभापतींनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेतले. उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्याकडून मला अपेक्षा होत्या. मात्र, त्यांचे वागणे बघून मला धक्का बसला. उपसभापतींकडून विचारांना तिलांजली देण्याचे काम झाले, अशी टीका शरद पवार यांनी केली. तसेच आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ज्या उपसभापतींनी सभागृहात नियमांना महत्त्व दिले नाही, ते निलंबित सदस्यांना चहापान द्यायला गेले. सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झालं. आज सदस्यांनी अन्नत्याग केला. मीही आज दिवसभर अन्नत्याग करणार आहे. त्यांच्या अभियानात मी सहभागी होणार आहे, असं शरद पवार म्हणाले. निलंबित खासदारांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचेही शरद पवार यांनी जाहीर केले.