नेरुळमध्ये सुरु करणार काळजी केंद्र

रहेजा मैदानात 1700 खांटाची व्यवस्था

नवी मुंबई : शहरात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता पालिकेकडूनही त्वरित उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहाता पालिका प्रशासनाने नेरुळ येथील एका मैदानात 1700 खाटांचे करोना काळजी केंद्र सुरू करण्याचे ठरवले आहे. येत्या 15 दिवसांत हे केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या 34 हजाराच्या घरात गेली आहे. तसेच 700पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही 3 हजार 500 उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यामुळे पालिका शहरात जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवीत आहे. गेल्या आठवडयात काळजी केंद्रासह करोना रुग्णालय तयार करून खाटांची संख्या वाढवली आहे. निर्यातभवन येथील सुविधा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी प्राणवायू खाटांची खास महिलांसाठी सुविधा करण्यात आली आहे. वाशी येथील निर्यातभवन तसेच तुर्भे येथील राधास्वामी सत्संग भवन येथे 1000 प्राणवायू खाटा वाढविल्या आहेत. आता नेरुळ येथील रहेजा मैदानात 1700 साध्या खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. पुढील 15 दिवसांत हे केंद्र सुरू होईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी दिली. ‘इंडिया बुल्स’चे केंद्र तात्पुरते बंद करोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने पालिकेने पनवेल येथील ‘इंडिया बुल्स’ प्रकल्पात काळजी केंद्र सुरू केले होते. सुरुवातीपासूनच याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. तसेच ते शहराबाहेर असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी अडचण होत होती. हे केंद्र तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. इतर रुणांवरही उपचार गेल्या सहा महिन्यांपासून वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णाची गैरसौय होत होती. मात्र आता इतर आजारांच्या रुग्णांसाठी आजपासून आरोग्यसेवा सुरू करण्यात आली. तिसर्‍या मजल्यावर 90 खाटांची व्यवस्था करण्यात आली असून अतिदक्षता खाटाही दिल्या जाणार आहेत. गेले काही दिवस फक्त बाह्यरुग्णसेवा सुरू केली होती. आजपासून 90 खांटांची व्यवस्था केली आहे. याबरोबरच टप्प्याटप्प्याने खाटांची संख्या वाढवली जाणार असून अतिदक्षता खाटांची सुविधा करण्यात येणार आहे.