सफाई निरीक्षकांचे धरणे आंदोलन

निरीक्षक पद निर्माण करण्याची मागणी

नवी मुंबई ः महापलिकेच्या साफसफाई विभागात काम करणार्‍या 250 निरीक्षकांचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून आज (दि.28 सोमवार) त्यांनी पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नवीन निविदा प्रक्रियेत निरीक्षक पद निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हा प्रश्‍न मार्गी लागावा म्हणून आ. गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. येत्या निविदा प्रक्रियेत निरीक्षकांचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. 

 नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहराची साफसफाई करण्यात येते. त्यामध्ये 91 ठेकेदार काम करत असून सुमारे साडे चार हजार सफाई कर्मचारी पालिकेच्या हजेरी पटलावर आहेत. 20 सफाई कर्मचार्‍यांच्या मागे 1 निरीक्षक नेमण्यात येत असून त्यांची संख्या 250 आहे. गेली 25 वर्ष हे निरीक्षक पालिकेत निरनिराळ्या ठेकेदारांच्या हाताखाली काम करत असून त्यांना सफाई कर्मचार्‍यांप्रमाणेच वेतन देण्यात येते. नवीन निविदा प्रक्रियेमध्ये ठेकेदार दरवेळी स्वतःचा सफाई निरीक्षक नेमत असल्याने सफाई कर्मचार्‍यांचाही गोंधळ उडतो. त्यामुळे नवीन निविदा प्रक्रियेत सफाई निरिक्षक हे पद निर्माण करुन उपलब्ध सफाई निरिक्षकांची त्यापदावर नेमणुक करावी व त्यांची वेतनश्रेणी ठरवावी अशी मागणी गेली अनेकवर्ष निरीक्षक पालिकेकडे करत आहेत. मात्र त्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष न दिल्याने हा प्रश्‍न तसात प्रलंबित राहिला. आता पालिकेने साफसफाई कामाची नवीन निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या आपल्या मागणीचा पालिकेने विचार करुन नवीन निविदेमध्ये सफाई निरीक्षक हे पद निर्माण करावे यासाठी 250 निरीक्षकांनी सोमवारी पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले. याची दखल घेऊन आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन सफाई निरीक्षकांचा प्रश्‍न निकाली काढण्याची मागणी केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी दिल्याचे सुत्रांनी सांगितले.