सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार करा

मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

मुंबई ः कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे गेले सहा महिने लोकल सेवाह ठप्प झाली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच सध्या प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र आता इतरांनाही मुंबई लोकलमधून प्रवास करु देण्यासंदर्भात विचार करा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (29 सप्टेंबर) राज्य सरकारला केल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, रोजगार बंद झाले, व्यवसाय बुडाले, मात्र आता अनलॉकच्या माध्यमातून हळूहळू व्यवहार सुरळीत होत आहेत. सरकारी, खाजगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं सुरु झाली आहेत. तेव्हा लोकांच्या प्रवासाबाबतही प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा. कारण मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येकालाच रस्त्याने प्रवास करणं शक्य नाही. मुंबईबाहेरुन येणार्‍यांचे काही तास प्रवासात जात आहेत. त्यामुळे लोकल ट्रेन चालू करणं हाच एक पर्याय आहे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.