वाशीमध्ये 56 निरंकारी भक्तांचे रक्तदान

नवी मुंबई : कोविड-19 चीमहामारी सुरु झाल्यापासून संत निरंकारी मिशन वेगवेगळ्या सेवांच्या माध्यमातून योगदान देत आले आहे. अनलॉकच्या कालावधीत रक्तदान शिबिरांची श्रृंखला आयोजित करुन मानवतेच्या सेवेसाठी पुढे येत आहे. याच रक्तदान अभियानाच्या अंतर्गत संत निरंकारी सत्संग भवन, वाशी येथे रविवार, 11 ऑक्टोबर, 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 56 निरंकारी भक्तांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या उत्साहाने निरंकारी रक्तदात्यांनी भाग घेतला. एकंदर 79 इच्छुक रक्तदात्यांपैकी 56 रक्तदाते रक्तदानास पात्र ठरले. संत निरंकारी रक्तपेढी द्वारेरक्त संकलनाचे कार्य करण्यात आले. रक्तदाता आणि रक्तपेढीचे डॉक्टर्स तसेच मेडिकल तंत्रज्ञांच्या चमूंनी कोविड-19 च्या संदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आणि सावधानतेचे काटेकोर पालन केले. याशिबिराचे उद्घाटन नवी मुंबई महानगर पालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश वैती यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक, मुखी तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते. संत निरंकारी मंडळाच्या स्थानिक सेक्टर संयोजक आणि वाशी येथील ब्रांच मुखी यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सेवादल आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.