57 हजार 776 बालकांना पोलीओ लसीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 02, 2020
- 730
2 ते 6 नोव्हेंबर 2020 विशेष लसीकरण मोहीम ; 753 पथके तयार
नवी मुंबई ः केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रविवारी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी रितीने राबविण्यात आली. महानगरपालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या वतीने खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये याठिकाणी 608 स्थायी बूथ तसेच रेल्वे स्टेशन, डेपो, टोल नाके याठिकाणी 101 अस्थायी बूथ तसेच दगडखाणी, उड्डाणपूल, रेल्वेलगत असलेल्या झोपड्यांमधील लसीकरणासाठी 28 मोबाईल बूथ अशाप्रकारे विविध ठिकाणी एकूण 737 लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. साधारणत: 5 वर्षाखालील 78 हजार लाभार्थी बालके नजरेसमोर ठेवून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.
संपूर्ण दिवसभरात महापालिका क्षेत्रातील 5 वर्षाखालील 57 हजार 776 बालकांनी पल्स पोलीओ लसीकरणाचा लाभ घेतला. ज्या संभाव्य लाभार्थी बालकांना काही कारणांमुळे लसीकरण झालेले नाही त्यांच्याकरिता विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत असून 2 ते 6 नोव्हेंबर 2020 या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलीओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. याकरिता 753 पथके निर्माण करण्यात आलेली आहेत. कोव्हीडच्या काळात ही पल्स पोलिओ लसीकरण मोहीम होत असल्याने व लहान बालकांना लसीकरण केले जात असल्याने सर्व बूथवर कोरोना प्रतिबंधात्मक सुरक्षा बाबींचे पालन केले जात होते. तशा प्रकारच्या काटेकोर कार्यवाहीच्या सूचना बूथवर कार्यरत कर्मचारी, स्वयंसेवक यांना देण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून सर्व बुथसमोर सुरक्षित अंतर राखण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली होती. मास्कचा वापर स्वयंसेवकांसह नागरिकांनाही अनिवार्य करण्यात आला होता.
बालकाला लस पाजण्यापूर्वी व पाजल्यानंतर हात सॅनिटाईज करण्यात येत होते. लस देताना बालक पालकाकडेच असेल याची काळजी घेऊन लांबूनच बाळाला स्पर्श न करता तसेच ड्रॉपरचा स्पर्श बाळाच्या तोंडाला होणार नाही याची दक्षता घेऊन लस पाजण्यात येत होती. अगदी लसीकरण झाल्याचे फिंगर मार्कींग करतानाही बाळाला स्वयंसेवकाने स्पर्श न करता बालकाचे बोट पालकांना धरण्यास सांगून फिंगर मार्कींग करण्यात येत होते. अशा प्रकारची काळजी सर्व पोलिओ बुथवर घेण्यात आली. तथापि 5 वर्षाखालील ज्या बालकांना लसीकरण झालेले नसेल अशा बालकांच्या घरांना भेट देणार्या महानगरपालिका स्वयंसेवकांना बालकांबाबत माहिती देऊन पोलिओ डोस पाजून घेण्याबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai