जलसाठा तळाला...पाऊस कुठे पळाला?
- by मोना माळी-सणस
- Jun 20, 2026
- 33
नवी मुंबई ः राज्यात मान्सूनच्या विलंबामुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले असून अनेक भागांमध्ये धरणांतील जलसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राज्यातील प्रमुख जलाशयांमध्ये 25 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने प्रशासनाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. अनेक प्राधिकरणांनी 10 ते 25 टक्के पाणीकपात केली आहे. तर ग्रामीण भागातही पाणीटंचाईचे असून बळीराजा पेरणीसाठी पावसाला साद घालत आहे.
राज्यात मान्सूनचे आगमन रखडल्याने पाणीसंकट अधिकच गडद झाले आहे. जून महिना संपत आला तरी मान्सूनचे आगमन झालेले नाही. परिणामी धरणांतील जलसाठा झपाट्याने घटत असून अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये केवळ 24 ते 26 टक्के जलसाठा शिल्लक असल्याची स्थिती आहे.
राज्याचे प्रमुख ऊर्जाकेंद्र असलेल्या कोयना धरणातील उपयुक्त जलसाठा गेल्या 12 वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला आहे. पावसाचा विलंब कायम राहिल्यास वीज निर्मितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे परिसरातही जलसंकटाचे पडसाद उमटू लागले आहेत. मुंबईच्या जलाशयांमध्ये केवळ सुमारे 10 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीकपात लागू करण्यात आली असून बांधकामे आणि जलतरण तलावांना होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. ठाण्यात 20 टक्के, पनवेलमध्ये 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबईत 10 टक्के पाणीकपात सुरु आहे. पालिकेच्या मोरबे धरणात 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल एवढाच साठा शिल्लक राहिला आहे. त्यापार्श्वभुमीवर उद्याने, बांधकामे, जलतरण तलाव, कार वॉशिंग सेंटर ला पुरवला जाणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. पाणी जपून वापरण्याचे आवाहन सर्व प्राधिकरणांकडून नागरिकांना करण्यात येत आहे. पावसाने लवकर हजेरी न लावल्यास राज्यातील पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने सर्व विभागांना पाणीसाठा जपण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मान्सूनच्या विलंबामुळे शेतकरीही चिंतेत असून पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यात 22 ते 25 जूननंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असली, तरी तोपर्यंत पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पाऊस लांबल्याने एकीकडे शेती संकटात सापडली आहे, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे राज्यभरात जलसाठा तळाला... पाऊसकुठे पळाला? अशीच परिस्थिती निर्माण झाली असून जलसंकटाचे सावट आणखी गडद होत आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जलसंपदा विभागातर्फे राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याबाबत विशेष सादरीकरण करण्यात आले. या अहवलानुसार राज्यातील सुमारे 3 हजार 28 धरणांमध्ये 1,442.34 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच 25 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण 31 टक्के इतके होते. दरम्यान, बैठकीत राज्यातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता चिंता व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑगस्टपर्यंत पाणी जपून वापरण्याची सूचना केली.दरम्यान, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना पाणीसाठा जपून वापरण्याबाबत विशेष सूचना करण्यात आली आहे. त्याशिवाय अवैध उपसा रोखण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील धरणांचा पाणीसाठा
- विभाग गतवर्षी यंदा
- नागपूर 32% 34%
- अमरावती 37.82% 37.50%
- छ. संभाजीनगर 30.37% 25.58%
- नाशिक 32.02% 24.17%
- पुणे 32.33% 13.98%
- कोकण 38.57% 28.90%
- एकूण 33.07% 23.54%
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस