कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत असताना राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यापासून बंद असलेले राज्यातील कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू होणार आहेत. सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहे. यासंबंधीची एसओपी लवकरच जारी केली जाणार आहे. मात्र मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, सिनेमागृहात खाण्याचे पदार्थ घेऊन जाता येणार नाहीत.

राज्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांडूना सरावासाठी कंटेनमेंट झोनबाहेर स्विमिंग पूल उद्यापासून सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय कंटेनमेंट झोनबाहेर योगा इन्स्टिट्युटही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, शूटिंगसारखे इनडोअर गेम साठीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. यासंबंधीच्या एसओपीही लवकरच जारी करण्यात येणार आहे.