Breaking News
तब्बल 6 पुरस्कारांची नोंद ; दुसर्यांदा पटकावले अव्वल स्थान
नवी दिल्ली : जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. जलसंपत्ती नियमनात राज्याने दुसर्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. यातील विविध क्षेत्रात राज्याला एकूण 6 पुरस्कार मिळाले आहेत.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलसंधारण क्षेत्रात वैविध्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती आणि संस्थाच्या कार्याचा गौरव केला जातो. याच पार्श्वभूमीवर नुकतंच ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2019’ चे वितरण करण्यात आले. यावेळी विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्राला एकूण 6 पुरस्कार मिळाले आहेत. सांगली जिल्ह्याला नदी पुनरूज्जीवनासाठी पुरस्कार मिळाला आहे. तर अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला पहिला पुरस्कार मिळाला. याशिवाय नाशिक, जळगाव आणि बीड जिल्ह्यांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
जलसंपत्ती नियमनात महाराष्ट्र देशात पुन्हा अग्रेसर
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात देशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला सलग दुसर्यांदा राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यातील उपलब्ध जलसंपत्तीचे न्यायोचित, समन्यायी व टिकाऊ वितरण व व्यवस्थापन यासाठी ‘महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा, 2005’ अन्वये जलसंपत्ती नियमन प्राधिकरण स्थापन झालेले आहे. राज्यातील भू-पृष्ठावरील उपलब्ध जलसंपत्तीचे तसेच भू-जलाचे हे प्राधिकरण नियमन करते.
प्राधिकरणाने स्वायत्तपणे जनहितार्थ घेतलेले निर्णय, त्यांच्या अंमलबजावणीने जलक्षेत्रात झालेला सकारात्मक परिणाम, अधिनियमाने विहित केलेल्या जबाबदार्यांची अंमलबजावणी, पाण्याचा काटेकोर वापर, जल प्रदूषणावर नियंत्रण, सांडपाण्याचा पुनर्वापर यासाठी केलेली जनजागृती या सर्व निकषांचा विचार करुन केंद्र शासनाने देशातील ’सर्वोकृष्ट जल नियमन प्राधिकरण’ या संवर्गातील प्रथम पुरस्कारासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची सलग दुसर्यांदा निवड केली आहे.
नदी पुनरूज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला
नदी पुनरूज्जीवन श्रेणीमध्ये देशातील एकूण 6 विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्ह्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला नदीच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय अमरावती जिल्हयातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्थेचा पहिला तर नाशिक जिल्हयातील दिंडोरी येथील वाघाड प्रकल्पाला या श्रेणीमधे दुसर्या क्रमांकांचा पुरस्कार केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai