26 नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन

शेकापचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ; शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्यांना विरोध

पनवेल : केंद्रीय कृषी बिलाविरोधात शेकापक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्राच्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्यांना विरोध करण्याचा निर्धार राज्यातील शेतकरी कामगार पक्षासह सर्व शेतकरी संघटनांनी घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या 26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या दिवशी पक्षाची ताकद दाखवित संपूर्ण पनवेल लालेलाल करण्याचे आवाहन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील यांनी केले आहे.

शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथे शेकापच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा चिटणीस मंडळाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आ. जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा घाट रचला असून तो कदापी यशस्वी होऊ देता कामा नये यासाठी केंद्र सरकार विरोधात, 26 नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या कायद्यातील तरतूदी अतिशय भयानक आहेत. सिलींग रद्द, शेतकरी असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या पिकाला हमी भाव दिला जाणार नाही. महत्त्वाचा भाग असणारे कृषी उत्पन्न बाजार समित्याच रद्द करण्याचा घाट देखील केंद्राने घातला आहे. या प्रश्‍नांप्रमाणेच निसर्ग चक्रीवादळात झालेले नुकसान अजूनही भरुन देण्यात आलेले नाहीत. कित्येक नुकसानग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचितच आहेत. झाडनिहाय मदत देतानाही अतिशय अन्याय करण्यात आला आहे. कोरोनामुळे ओढवलेल्या भयंकर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आर्थिक मदत देण्याची गरज आहे. छोट्या-मोठया उद्योगांना सरकारने मदत करण्याची गरज आहे. या काळात आलेले भरमसाठ विजबील पूर्णपणे माफ केलेच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. शासनाने शेतकरी विरोधी धोरण अवलंबले आहे त्या धोरणाला 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विरोध दर्शविण्यात येणार आहे.