आयसीयू व मेडिकल वॉर्ड सुरू करण्यात ढिलाई नको

आयुक्तांचे आदेश ; ऐरोली व नेरूळ रूग्णालय 1 जानेवारीपासून सुरू करण्याचे उद्दिष्ट 

नवी मुंबई ः ऐरोली व नेरूळ येथील पालिकेची रुग्णालये 1 जानेवारीपासून पुर्ण कार्यक्षमतेने सुरु करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. या दोन्ही रूग्णालयात मेडिकल व आयसीयू वॉर्ड्स सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत व याविषयी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीची नियमित तपासणी केली जात आहे. 

महानगरपालिकेच्या नेरूळ व ऐरोली येथील रूग्णालयाच्या प्रशस्त इमारती असून त्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याकडे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर विशेष लक्ष देत आहेत. या अनुषंगाने आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके आणि संबंधित रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांची संयुक्त बैठक घेऊन मेडिकल व आयसीयू वॉर्ड्स सुरू करण्यासाठी आवश्यक गरजेच्या गोष्टींची सविस्तर माहिती घेतली व त्यांच्या पूर्ततेसाठी नियोजनात्मक चर्चा केली. यामध्ये 1 जानेवारीपासून ऐरोली व नेरूळ रूग्णालयात मेडिकल व आयसीयू वॉर्ड्स सुरू करावयाचे आहेत हे स्पष्ट करीत त्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता मुख्यालय पातळीवरून केली जाईल मात्र रूग्णालये सुरू करण्याबाबतचे प्रत्यक्ष काम करून घेण्याची जबाबदारी संबंधित रूग्णालयांच्या वैद्यकीय अधिक्षकांवर सोपविण्यात आलेली आहे. सध्या कोव्हीडचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसून येत असून 8 कोव्हीड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित दाखल करणे तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आलेले आहे. त्यामुळे या कोव्हीड केअर सेंटरसाठी घेण्यात आलेली बेड्स व इतर अनुषांगिक साधनसामुग्री तसेच मनुष्यबळ ऐरोली व नेरूळ येथील दोन्ही रूग्णालये सुरू करण्यासाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी सूचना केल्या. वाशी, ऐरोली व नेरूळ या तिन्ही रूग्णालयात उपलब्ध असलेले डॉक्टर्स व इतर मनुष्यबळ यांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 1 जानेवारी हे रूग्णालय सुरू करण्याचे उद्दिष्ट असून त्यापूर्वीच आवश्यक डॉक्टर्स व नर्सेस आणि अनुषांगिक कर्मचारीवर्ग उपलब्ध करून घेऊन त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे आयुक्तांनी यावेळी निर्देशित केले. 

3 डिसेंबर रोजी ऐरोली व 8 डिसेंबर रोजी वाशी रुग्णालयाला अचानक भेट देऊन आयुक्तांनी तेथील आरोग्य सेवांची तपासणी केली होती व महानगरपालिका रूग्णालयात उपचारासाठी येणारे रूग्ण बहुतांशी सर्वसामान्य असल्याने रूग्णालयीन सुविधांच्या अभावामुळे एकही रूग्ण खाजगी रूग्णालयात संदर्भित केला जाऊ नये ही भूमिका स्पष्ट केली होती. त्यादृष्टीने ऐरोली व नेरूळ येथील रूग्णालये सक्षमपणे सुरू करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले होते. या दोन्ही रूग्णालयांमध्ये आयसीयू व मेडिकल वॉर्ड सुरू करण्यासाठी 1 जानेवारी हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कार्यवाही सुरू असून सातत्यपूर्ण आढावा बैठकांव्दारे याकडे काटेकोर लक्ष दिले जात आहे