खेळाडूंचे करार नूतनीकरण रखडले

व्यवसायिक क्रीडा स्पर्धांचे आमंत्रण स्विकारायचे की नाही याविषयी संभ्रम

नवी मुंबई : महापालिकेने खो-खो, शुटिंगबॉल व कबड्डीचे व्यावसायिक संघ तयार केले आहेत. 2018-19 साली या तिन्ही खेळांचे संघ अस्तित्वात येऊन राज्यभरात या संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र यंदा कोरोनामुळे या खेळाडूंचे पालिकेकडून केले जाणारे करार नूतनीकरण अद्याप झालेले नाही. याचा फटका खेळांडूना बसत आहे. तसेच  करार नूतनीकरणाअभावी संघ स्पर्धेत भाग घेणार की नाही याची चिंता खेळाडूंना भेडसावत आहेत. 

नवी मुंबई महापालिकेने खेळाडूंना वाव मिळावा यासाठी पाऊले उचलत महापालिकेचा व्यवसायिक संघ सुरू करण्याची घोषणा 2019-20 साली केली. ती अंमलात देखील आणली. मैदानी चाचणी घेत खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यानुसार शूटिंग बॉल 10, कबड्डी 12 व खो-खोसाठी 12 असे एकूण 34 खेळाडू निवडण्यात आले होते. या खेळाडूंना दरमहा 15 हजार रुपयांचे मानधन देण्याचे पालिकेने ठरवले होते. त्यानुसार संघ तयार झाले होते. 2020-21 वर्ष हे या तिन्ही संघांनी गाजवत नवी मुंबई महापालिकेचा दबदबा संपूर्ण राज्यात व देशात तयार होता. नवी मुंबई महापालिकेच्या शूटिंग बॉल संघाने 13, खो खो संघाने 3, कबड्डीच्या संघाने 1 विजेते व उपविजेतेपद पटकावून नवी मुंबई महापालिकेचे नाव राज्यात व देशभर पसरवले आहे. 2019-20साल हे या तिन्ही संघांसाठी सुवर्णमयी ठरले होते. 2019-20 मध्ये कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. लॉकडाऊन लागल्याने या खेळाडूंचे पालिकेकडून केले जाणारे करार नूतनीकरणही रखडले. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार पुर्वपदावर येत असताना या खेळाडूंच्या करार नुतनीकरणाची फाईल गेले तीन महिने होऊनही रेंगाळली आहे. सध्या कोरोनाचा आलेख उतरू लागलेला असताना खेळाडू देखील आपल्या सरावाला लागले आहेत. जगातील क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असताना देशांतर्गत व राज्यांतर्गत क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी आयोजक सरसावले आहेत. शूटिंग बॉलची व्यवसायिक स्पर्धा जाहीर झाली आहे. तर खो खो व कबड्डीच्या व्यवसायिक स्पर्धांचे देखील आयोजन कधीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवसायिक क्रीडा स्पर्धांचे आमंत्रण आल्यास ते स्वीकारायचे की नाही? याबाबत प्रशिक्षक देखील साशंक आहेत. 34 खेळाडू व प्रशिक्षकांच्या करार नुतनीकरणाबाबत पालिकेकडून संथ हालचाली सुरू आहेत. तीन महिन्यांपूर्वी तयार केलेली करार नूतनीकरणाची फाईल तशीच पडून आहे. मात्र करार नूतनीकरण न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेले खेळाडू पालिकेकडे डोळे लावून बसले आहेत. खेळाडूंच्या भविष्याबत नवी मुंबई पालिका गांभीर्याने विचार करत आहे. तिन्ही व्यवसायिक संघांचे करार नुतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच या करारांचे नूतनीकरण करण्यात येऊन खेळाडूंना दिलासा मिळेल असे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.