पनवेलमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

पनवेल ः पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींचा समावेश असून, 15 जानेवारीला या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार सोमवारी (दि. 28) पनवेल पंचायत समितीमध्ये आकुर्ली, मोर्बे आणि खैरवाडी ग्रामपंचायतींमधील भाजपच्या उमेदवारांनी पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले.

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, पनवेल तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यातील आकुर्ली, मोर्बे आणि खैरवाडी या ग्रामपंचायतींमधील भाजपच्या उमेदवारांनी आपले अर्ज पनवेल पंचायत समितीत निवडणूक अधिकारी सिंदेश पाटील आणि संतोष ठोंबर यांच्याकडे दाखल केले.

या वेळी पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबर ही अंतिम तारीख असून, अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होणार आहे.