नवी मुंबईत भाजपला गळती

गवते कुटुंबियांनी बांधले शिवबंधन

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच नवी मुंबई भाजपाला गळती लागण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी तुर्भे येथील सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता दिघा येथील माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते आणि दिपा गवते यांनी मंगळवारी (दि. 29)ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांची साथ सोडून मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. आणखी 12 जण महाविकास आघाडीत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. 

राष्ट्रवादीबरोबर वीस वर्षे असलेले ऋणानुबंध तोडून नाईक यांनीही गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीअगोदर भाजपचा झेंडा हाती घेतला. पालिका सभागृहातील 52 नगरसेवकांनी त्या वेळी त्यांना साथ दिली. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पालिका निवडणुकीच्या तीन महिने अगोदर गेल्या वर्षी तुर्भे येथील नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या चार समर्थक नगरसेवकांसह शिवबंधन बांधले. कुलकर्णी हे नाईकांचे खंदे सर्मथक मानले जात होते. मंगळवारी झोपडपट्टी भागातील एक प्रबळ नगरसेवक नवीन गवते, त्यांची पत्नी अपर्णा गवते आणि भावजय दीपा गवते यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. याप्रसंगी परिवहन मंत्री अनिल परब, खासदार राजन विचारे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी, करण मढवी आदी उपस्थित होते. दिघ्यातील पाचपैकी तीन प्रभागांवर गवते कुटुंबाची पकड आहे. उरलेल्या दोन प्रभागात शिवसेनेचे नगरसेवक आहेत. गवते कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे दिघ्यातून भाजप हद्दपार झाली असून शिवसेनेची ताकद प्रचंड वाढली आहे.

12 जण महाविकास आघाडीत जाणार?
नेरुळ, वाशी, घणसोली व कोपरखैरणे व ऐरोली येथील आणखी दहा ते बारा नगरसेवक हे पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा आहे.