राज्यात 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 30, 2020
- 883
मुंबई ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणारे लॉकडाऊन राज्य सरकारने 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव संजयकुमार यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यात 14 ऑक्टोबर, 30 नोव्हेंबरच्या परिपत्रकात जाहीर केलेली लॉकडाऊनची स्थिती कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्चपासून लॉकडाऊन घोषित केले. ज्या राज्यात कोरोनाचा प्रसार कमी होत आहे, त्याठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जात आहे. त्या राज्यातील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू केले जात आहेत. महाराष्ट्रातही मिशन बिगीन अंतर्गत टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू केले जात असताना लॉकडाऊनचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये आणि सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेनचा प्रवास नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही बंदच राहणार आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना मिशन बिगीन अंतर्गत राज्य सरकारने खासगी, शासकीय कार्यालये, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, मंदिरे, जिम, मैदानी खेळाचे सराव, मॉर्निंग वॉक आदीला परवानगी दिली आहे. मिशन बिगीन अंतर्गत सर्व व्यवहार सुरू होताना कोविडचे नियम पाळावेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
लोकलबाबत घोषणा नाही
मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनमधून सर्व सामान्य नागरिकांना प्रवेश कधी दिला जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला लोकल ट्रेन सुरू होईल अशी अपेक्षा मुंबईकर व्यक्त करत आहेत. मात्र लॉकडाऊन वाढवताना सरकारने लोकल ट्रेनबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. यामुळे लोकलसंदर्भात निर्णय झाल्यास घोषणा स्वतंत्रपणे होऊ शकते.
मुंबईतील शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद
मुंबईतील कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून 31 डिसेंबर पर्यंत मुंबईमधील शाळा सुरू न करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. 31 डिसेंबरपर्यंत रुग्णांची संख्या किती याचा आढावा घेऊन मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार 15 जानेवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी जमावबंदी
राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. गर्दी वाढल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी जमावबंदी लागू आहे. यानुसार पाचपेक्षा अधिक नागरिक एका ठिकाणी जमा होऊ शकत नाहीत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai