Breaking News
रायगड : पेण येथील चिमुरडीची बलात्कार आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असून उज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथील चिमुरडीवर केलेल्या बलात्कार आणि हत्येसंदर्भात राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी, त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले.
पीडित कुटुंबियांना जिल्हास्तरावरील योजनेचा निधी देण्यात येणार असून शासनाच्या योजनेतून घर बांधून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. तसेच, शक्य झाल्यास आरोपीवर मोक्काची कारवाई करण्यात येणार असल्याचे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार असून उज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पेणमधील या घटनेचा निषेध करीत शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यावेळेस, पेण शहरातील बाजारपेठेत मोर्चा काढण्यात आला होता.
पेण शहराजवळ असलेल्या आदिवासी वस्तीतील एका अडीच वर्षाची चिमुरडी ही तिच्या आई-वडिलांसोबत घरात झोपली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला घरातून नेऊन जवळच असलेल्या झुडपामध्ये तिच्यावर बलात्कार करुन हत्या केली. त्यानंतर तिला घरात ठेवत असताना जागे झालेल्या आजूबाजूच्या रहिवाशांनी या आरोपीला घरात शिरताना पाहिल्याने त्यांनी घराकडे धाव घेतली. यावेळी या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचं या रहिवाशांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तातडीने यासंदर्भात पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा घरामध्ये आढळून आला. पोलिसांनी या 28 वर्षीय आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान या चिमुरडीवर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये हे शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळेस आदिवासी वस्तीतील रहिवाशांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर या आदिवासी रहिवाशांनी या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपीवर यापूर्वी देखील तडीपारीची गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai