एपीएमसीतील हुक्का पार्लरवर छापा

36 तरुण-तरुणीसह हुक्का पार्लरमधील कर्मचारी ताब्यात  

नवी मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने घालुन दिलेल्या अटीं शर्तींचे उल्लंघन करुन चालविल्या जाणार्‍या एपीएमसीतील आर.बी. डी. लाँच या हुक्का पार्लरवर वाशी पोलिसांनी बुधवारी रात्री छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पिण्यासाठी दाटीवाटीने बसलेल्या 32 तरुण तरुणीना व 4 कर्मचाऱयांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनी सदर हुक्का पार्लरमधुन हुक्का ओढण्यासाठी लागणारे तंबाखु व इतर साहित्य देखील जप्त केले आहे.  

करोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने सर्व प्रकारचे हॉटेल्स, पब्स आणि बार आदींना अटी व शर्तीं घालुन सुरु ठेवण्याबाबात सक्त सुचना दिल्या आहेत. असे असताना, एपीएमसी सेक्टर-19डी मधील शक्ती आर्केडमध्ये असलेल्या आर.बी. डी. लाँच या ह्क्का पार्लरमध्ये शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घालुन दिलेल्या अटी शर्तीचे उल्लंघन करुन हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सदर हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजिव धुमाळ यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाने बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सदर हुक्का पार्लरवर छापा मारला.  

यावेळी सदर हुक्का पार्लरमध्ये हुक्का ओढण्यासाठी बसलेले तरुण तरुणी हे कुठल्याही प्रकारचे सामाजिक अंतर न ठेवता हुक्का ओढत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी बसलेल्या 32 तरुण तरुणींना तसेच त्यांना हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य पुरविणाऱया हुक्का पार्लरमधील 4 कर्मचाऱयांना ताब्यात घेतले. त्यांनतर या सर्वांवर एपीएमसी पोलीस ठाण्यात सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने अधिनियम तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह इतर कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व तरुण तरुणीं व कर्मचार्‍यांना नोटीस देऊन त्यांना पोलीस ठाण्यात हजर रहाण्याबाबत सुचित करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.