मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची जबाबदारी महा मेट्रोकडे

नवी मुंबई ः सिडकोकडून नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रोे प्रकल्पातील 11.1 कि.मी. च्या मार्ग क्र. 1 वरील उर्वरित कामांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) खर्च ठेव प्रणालीनुसार नियुक्ती करण्याचा निर्णय नुकताच सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला. यानुसार मार्ग क्र. 1 वरील उर्वरित कामे पूर्ण करण्याचे काम यापुढे महा मेट्रो करणार आहे. 

नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सिडको नवी मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प साकारत आहे. मार्ग क्र. 1 वर सप्टेंबर 2019 मध्ये मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली होती. सद्यस्थितीत मार्ग क्र. 1  वर उभारण्यात येणार्‍या 11 स्थानकांपैकी 1 ते 6 स्थानकांच्या उभारणीचे काम काही तांत्रिक कारणांमुळे तसेच कोविड-19 मुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे अपेक्षित गतीने होत नव्हते. यामुळे सदर मार्गावरील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे, या निकषांचा विचार करून या मार्गाचे काम महा मेट्रो यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महा मेट्रो या कंपनीस नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा 1 आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. 1 आणि 2 च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन आणि निगराणीचा अनुभव आहे. यामुळे नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 वरील उर्वरित कामांची जलदरीत्या अंमलबजावणी व्हावी याकरिता महा मेट्रोची नियुक्ती करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. 

या निर्णयामुळे मेट्रो मार्ग 1 वरील जलद गतीने पूर्ण होऊन या मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे. तसेच या प्रकल्पामध्ये गुंतवणूक केलेल्या भागधारकांना आणि नागरिकांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळणार आहे. नवी मुंबईकरांना प्रवासाचा जलद व सुखद पर्याय देण्यासह नवी मुंबईच्या आर्थिक विकासातही नवी मुंबई मेट्रो प्रकल्प योगदान देणार ठरणार आहे.   

प्रकल्पासाठी अर्थपुरवठा, आर्थिक शिस्त, मेट्रो मार्गालगच्या जमिनीचे मुद्रीकरण, प्रवासी भाड्याव्यतिरिक्त अन्य महसूल वाढवणे आणि उत्तम परिवहन जोडणी देणे या बाबींवरही आपण लक्ष केंद्रीत करणार आहोत. परिवहन केंद्रीत विकासाकरिता आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको