रूग्ण दुपटीचा कालावधी पावणेदोन वर्षावर

केवळ 1.74 टक्के रूग्णच अ‍ॅक्टिव्ह

नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना त्याला लाभलेली नागरिकांचा साथ  यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी घट तशीच कायम राहिली चित्र आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा 7 डिसेंबरपासून एखादा दुसरा अपवाद वगळता दोन आकडी संख्येवर आल्याचे चित्र दिसून येत आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून दिवाळीनंतर वाढविण्यात आलेल्या चाचण्यांच्या प्रमाणात खंड पडू न देता डिसेंबर महिन्यात चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात 72771 चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यात वाढ करीत डिसेंबर महिन्यात 80624 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. या चाचण्यांमध्ये 2751 नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून डिसेंबर महिन्यातील एकूण चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण कमी होऊन 3.41% इतकेच आहे. अशाप्रकारे कोरोना वाढीचा वेग काहीसा नियंत्रित दिसत असला तरी नागरिकांनी सुरक्षेच्या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 31 डिसेंबरपर्यंत एकूण 51002 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यापैकी 49060 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व 1051 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. नवी मुंबईतील कोरोनामुक्त होण्याचे 96.19 % हे प्रमाण आणि मृत्यूदराचे 2.06 % हे प्रमाण इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत चांगले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोनातून बरे होणार्‍या रूग्णांचे प्रमाण वाढत असलेले दिसून येत असून डिसेंबर महिन्याच्या  अखेरीस 49060 रूग्ण बरे होऊन घरी परतले (96.19 %) आहेत. रूग्णदुपटीच्या कालावधीतही लक्षणीय वाढ झालेली असून 30 नोव्हेंबरपर्यंत 263 दिवसांवर पोहचलेला रूग्णदुपटीचा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत 624 दिवस (पावणेदोन वर्षे) इतका झालेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्याही आता तीन आकड्यांमध्ये आलेली असून 31 डिसेंबर रोजी 891 (1.74 %) इतकेच कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत अ‍ॅक्टिव्ह आहेत. 30 नोव्हेंबरच्या तुलनेत (1605 रूग्ण, 3.32 %) प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे.