महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल

आमदार गणेश नाईक यांचे प्रतिपादन     

नवी मुंबई ः सुजाण जनता अपप्रवृत्तींचा निश्चितच विनाश करणार आहे. समाज चांगल्या गोष्टीची किंमत करणारा आहे असे नमूद करून नवी मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल अशी खात्री आ. गणेश नाईक यांनी दिली. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मुकेश गायकवाड यांसह दिघा व कोपरखैरणेतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या असंख्य पदाधिकार्‍यांनी रविवारी भाजपात पक्षप्रवेश केला. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना नाईक यांनी वरील उद्गार काढले.

 राष्ट्रवादीत असलेल्या माजी नगरसेवक मुकेश गायकवाड यांनी दिघा व कोपरखैरणेतील शिवसेना व राष्ट्रवादी पक्षांच्या असंख्य पदाधिकार्‍यांनी रविवारी भाजपात पक्षप्रवेश केला. सध्या भाजपला गळती सुरु झाली असताना राष्ट्रवादीतून भाजपात झालेल्या या इनकमिंगमुळे भाजपमध्ये उत्साही वातावरण पाहायला मिळाले. आमदार गणेश नाईक यांनी या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत केले. दिघा विभागात प्रभाग क्रमांक चार मधून माजी नगरसेवक मुकेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माया गायकवाड, संजय गायकवाड, ध्रुवपद फुलपागर, संजय जावळे, रामप्रवेश यादव, शिरीष गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. कोपरखैरणे प्रभाग 46 परिसरातही शिवसेनेला धक्का बसला आहे. माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 46चे शाखाप्रमुख किशोर मोरे यांच्यासमवेत संजय चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

गुंडशाही आणि बळाचा वापर करून भाजपाच्या कार्यकर्त्यांना धमकावून त्रास देण्याचे प्रकार विरोधकांकडून सुरू झाले आहेत. त्यावर चिंता करू नका, असा दिलासा देत आमदार गणेश नाईक यांनी आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश यावेळी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना दिला. सुजाण जनता अपप्रवृत्तींचा निश्चितच विनाश करणार आहे. समाज चांगल्या गोष्टीची किंमत करणारा आहे असे नमूद करून नवी मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल अशी खात्री त्यांनी दिली.