सिडकोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या

नवी मुंबई ः सिडकोच्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीकोनातुन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी सिडकोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यात भूसंपादन विभागाचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी सतिशकुमार खडगे यांच्याकडे मुख्य सामाजिक सेवा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार तर मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे विभागाचा कार्यभार असलेले अनिलकुमार पवार यांच्याकडे महाव्यवस्थापक (वसाहत)1, 2 आणि 3 विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. सिडकोच्या शहर सेवा-1 विभागाच्या व्यवस्थापक पदावरुन, फय्याज खान यांना दुर करुन, त्यांच्या जागी गजेंद्र जंगम यांच्याकडे शहर सेवा-1 व्यवस्थापक पदाचा पदभार देण्यात आला आहे. 

सानपाडा, नेरुळ, बेलापुर आणि उलवे व द्रोणागिरी विभागीय अधिकारी असलेले तुळशीराम परब यांच्याकडे व्यवस्थापक (पुर्नवसन) विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. सुभाष काकडे यांच्याकडे असलेला वाशी आणि कोपरखैरणेचा विभागीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार काढुन, त्यांच्याकडे पूर्णवेळ व्यवस्थापक (शहर सेवा-2) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच दीपक जोशी यांच्याकडे असलेले वसाहत अधिकारी-3 हे पद कायम ठेवुन त्यांच्याकडील वसाहत अधिकारी पदाच्या अतिरिक्त पदभरातून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. लक्ष्मीकांत डावरे यांच्याकडे वसाहत अधिकारी-1 सोबतच पनवेल आणि कळंबोली विभागीय अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रमाद बिडवे यांच्याकडे अतिरिक्त मुख्य भूमी व भूमापन अधिकारी भूसंपादन पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

सिडकोचे रखडलेले प्रकल्प आणि कामकाजाला अधिक गती देण्यासाठी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या केल्या असल्याचे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अविनाश मुदगल यांनी म्हटले आहे.