वाशी मार्केट यार्डच्या जागतिक पुनर्विकासाची घोषणा
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 26, 2026
- 15
माथाडी कायदा कायम राहणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई ः माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नसून तो अधिक मजबूत केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वडाळा येथील गृहप्रकल्पात सुमारे तीन हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे देण्यात येणार असून, वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
माथाडी चळवळीचे संस्थापक स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 93व्या जयंतीनिमित्त वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, पणनमंत्री जयकुमार रावल, महापौर सुजाता पाटील, नरेंद्र पाटील यांच्यासह आमदार, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने माथाडी कामगार उपस्थित होते. माथाडी कायदा हा कामगारांसाठी सुरक्षा कवच आहे, मात्र काही घटकांकडून हा कायदा संपवला जाईल असा संभ्रम निर्माण केला जात असला तरी शासन हा कायदा अधिक मजबूत करेल, तो संपू देणार नाही असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच या पवित्र कामगार चळवळीच्या नावावर काही खोट्या टोळ्या तयार झाल्या असून त्या कामगारांचे नुकसान करत आहेत. या अनधिकृत प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी आणि खऱ्या कामगारांचे हित जपण्यासाठी कामगार नेते व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन कठोर पावले उचलली जातील. यासोबतच 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांसंदर्भातील नियमाची काटेकोर अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी पणन मंत्री जयकुमार रावल आणि कामगार विभागाचे कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सर्व 36 माथाडी मंडळांचे सक्षमीकरण व पुनर्रचना करण्यात येत असल्याचे सांगितले. मंडळांच्या कामकाजाचे स्वतंत्र पॅनेलद्वारे लेखापरीक्षण करण्यात येणार असून, वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघात नुकसानभरपाई यांसारखे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. वडाळा येथील गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून आवश्यक एफएसआय आणि परवानग्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुमारे तीन हजार माथाडी कामगारांना आधुनिक घरे उपलब्ध होणार आहेत. भविष्यातही कामगारांसाठी आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
50 वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे मार्केट त्या काळी आशियातील मोठे केंद्र होते. आता वाशी एपीएमसी मार्केटचा बदलत्या व्यापार पद्धती आणि वाढत्या उलाढालीचा विचार करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी जमिनीखाली आणि जमिनीवर आवश्यक एफएसआय उपलब्ध करून देण्यात येईल. आधुनिक बाजारपेठेमुळे माथाडी कामगारांसाठी रोजगाराच्या संधीही वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माथाडी कामगारांच्या पुढील पिढीने उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, सीए, सीएस तसेच सनदी अधिकारी व्हावे, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सारथीच्या माध्यमातून योजनांची आखणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. वनमंत्री गणेश नाईक यांनी माथाडी कामगारांच्या आरोग्य व शैक्षणिक उन्नतीवर भर देत माथाडी रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि वडाळा गृहप्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. माथाडी कायद्याला कोणत्याही प्रकारे धक्का लागू न देणे ही सर्व कामगार प्रतिनिधींची सामूहिक जबाबदारी आहे. असंघटित कामगारांना हक्काचे वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि बोनस मिळवून देणाऱ्या या ऐतिहासिक कायद्याची मूळ चौकट कायम ठेवूनच त्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या पाहिजेत असे आमदार शशिकांत शिंदे यांनी संगितेल. पणनमंत्री जयकुमार रावल यांनीही वाशी मार्केटच्या पुनर्विकासासोबत 50 किलो वजनाच्या मर्यादेच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत माथाडी कामगारांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai