राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वाशी कोर्टाने 6 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य भोवलं असून आता त्यावर ही नोटीस बजावण्यात आली आहे.

26 जानेवारी 2014 रोजी राज ठाकरे यांनी वाशी इथल्या मेळाव्यात टोल नाका बंद करण्याबाबत प्रक्षोभक भाषण केलं होतं. त्यानंतर नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजाजन काळे यांनी काही कार्यकर्त्यांसह लगेच वाशी टोल नाका फोडला होता. त्याबाबत 30 जानेवारी 2014 रोजी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात 2018, 2020 मध्येही राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स आणि वॉरंट काढण्यात आलं होतं. आज ते वॉरंट रद्द झालं आहे. मात्र 6 फेब्रुवारीला राज ठाकरे यांनी कोर्टात उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्यामुळे राज ठाकरे आता वाशी कोर्टात हजर राहतात की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यादिवशी राज ठाकरे हजर न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल असंही कोर्टाने स्पष्ट केले आहे.