नवी मुंबईत कोंबड्यांना बर्ड फ्लू

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून 6 ठिकाणी कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. महापे इथल्या 2 आणि घणसोली इथल्या 4 पोल्ट्री मधल्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निदान झाले आहे. या ठिकाणचे 10 नमुने 25 जानेवारी रोजी चाचणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यातून या कोंबड्यांना बर्ड फ्लू ची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणाहून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्व कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याचे आदेश ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. रविवारी महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली असून रात्री 10 पर्यंत ही कारवाई सुरू होती. तसेच 6 कावळे आणि 2 कबुतरे यांच्या चाचणीचे निकाल येणे बाकी आहे. कोरोनाचं संकट कायम असताना बर्ड फ्लूमुळे आता भीतीचं वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी याआधीच बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू होत आहे.  मुंबई, ठाणेनंतर आता नवी मुंबईतही बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. नागरीकांना परिसरात मृत कोंबड्या आढळल्यास घाबरून न जाता त्याला स्पर्श करू नये. याबाबतची माहिती पालिका प्रशासनाला द्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव झुंझारे यांनी केले आहे.