पालिकेला हवी भाड्याने जागा

पनवेल : नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेकडून स्वमालकीच्या नवीन इमारती बांधण्याचे काम सध्या सुरु आहे. तोपर्यंत पालिकेचा कारभार भाड्याच्या गाळ्यातून होणार आहे. ज्या कोणाला पालिकेला त्यांच्या मालमत्ता भाड्याने द्यायच्या असतील अशांना 10 फेब्रुवारीपर्यंत पालिकेला संपर्क करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

पालिकेची मुख्य प्रशासकीय प्रस्तावित इमारतीसाठी 100 कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र ही इमारत बांधून त्याचे काम पूर्ण होईपर्यंत अजून अडीच वर्षे लागणार आहेत. त्यामुळे पालिकेने शासकीय, निमशासकीय अथवा खासगी व्यक्ती व संस्थांच्या मालकीच्या इमारती व गाळ्यांकडे प्रभाग कार्यालयांकडे लक्ष वेधले आहे. गाळे मालकांसाठी जाहीर सूचना पालिकेने काढली आहे. ज्या संस्था अथवा व्यक्तींना आपली मालमत्ता पालिकेला भाड्याने द्यायची असेल अशा गाळेमालकांनी 10 फेब्रवारीपर्यंत पालिकेला संपर्क करण्याचे आवाहन याद्वारे पालिकेने केले आहे.