अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीला कोरोना झाल्याचे उघड

उपस्थितांची चाचणी करण्यासाठी शोध सुरू ; पालिकेचा ढिसाळ कारभार

नवी मुंबई : तुर्भे येथील भरतशेठ क्वारी येथे 43 वर्षांच्या महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिल्यानंतर तुर्भे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मनपा प्रशासनाने संबंधित महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली असून, अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची चाचणी करण्यासाठी शोध सुरू केला आहे.

दगडखाण परिसरात राहणार्‍या महिलेला थकवा जाणवत असल्यामुळे तिला सोमवारी उपचारासाठी महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी साडेनऊ वाजता या महिलेचा मृत्यू झाला. रात्री साडेअकरा वाजता मृतदेह शवागृहामध्ये ठेवण्यात आला. बुधवारी रुग्णालयातील कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी मृतदेहावर तुर्भे स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी 300 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. गुरुवारी सकाळी महानगरपालिकेचे कर्मचारी मृत महिलेच्या घरी गेले व मृत महिलेला कोरोना झाला होता. यामुळे अंत्यसंस्कार प्रक्रियेला उपस्थित असणारांची कोरोना चाचणी करायची असल्याचे सांगितले. महानगरपालिका कर्मचार्‍याने दिलेल्या माहितीमुळे सर्वांना धक्का बसला आहे.